एसआयपी चा हप्ता चुकला तर

एसआयपी चा हप्ता चुकला तर

म्युच्युअल फंडात एसआयपी करणाऱ्यांना अनेकदा प्रश्न पडतो की आपण जे दरमहा हप्ते भरतो त्यातला एखादा एसआयपी चा हप्ता चुकला तर काय होईल म्हणजे याचे परिणाम काय होतील? कारण आपण अनेकदा असं ऐकलेलं किंवा अनुभवलेलं असतं की आवर्ती ठेवीचे एक किंवा एकापेक्षा जास्त हप्ते चुकले तर आपल्याला त्याच्यावर दंड भरायला लागतो आणि सलग तीन-चार हप्ते भरायचे राहिले तर आपली आवर्ती ठेव बंद होते.

आयुर्विमा किंवा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी च्या बाबतीतही असंच होतं की लाईफ इन्शुरन्सचा एखादा हप्ता भरला नाही तर आपली लाईफ इन्शुरन्स पॉलिसी बंद होते आणि त्या पॉलिसीचा आपल्याला उपयोग होत नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात ही शंका असते की एसआयपी चा हप्ता चुकला तर किंवा भरायचा राहून गेला तर त्या बाबतीत सुद्धा असंच काही होतं का? म्हणजे एसआयपी बंद होते का? ती पुन्हा चालू करता येईल का? त्यावर दण्ड किती भरावा लागतो?

तर आज आपण बघणार आहोत जेव्हा म्युच्युअल फंडातील तुमचा एसआयपी चा हप्ता भरायचा राहून जातो तेव्हा नेमकं काय होतं म्हणजे तुमचा म्युच्युअल फंडातील एसआयपी चा हप्ता चुकला तर काय होईल?

पण त्याआधी तुम्हाला एसआयपी म्हणजे काय याची माहिती करून घ्यायची असेल तर यासंबंधी एक लेख आम्ही याआधी बनवला आहे. तो लेख खालील लिंकवर क्लीक करून तुम्ही नक्की बघा.

आधी आपण बघूया एसआयपी ची थोडक्यात माहिती.

एसआयपी हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे. एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लॅन (Systematic Investment Plan) ज्यात तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम भरता. ही रक्कम ५०० रुपये किंवा त्याहून जास्त सुद्धा असू शकते. एसआयपी मध्ये पैसे भरण्याचे अनेक प्रकार आहेत.

तुम्ही एसआयपी मध्ये गुंतवणूक दरमहा म्हणजे दर महिन्याला करु शकता, दर तीन महिन्यांनी करु शकता, दर सहा महिन्यांनी करु शकता किंवा वर्षातून एकदा करु शकता. गुंतवणूक कशी करायची हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतं थोडक्यात एसआयपी मध्ये रक्कम कशी भरायची हे तुम्ही स्वतः ठरवू शकता.

मात्र यामध्ये एक खुप महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही जी रक्कम एसआयपी च्या माध्यमातून भरता ती रक्कम म्युच्युअल फंडात एका ठराविक तारखेला जमा करण अतिशय आवश्यक आहे. एसआयपी चा प्रमुख फायदा हा आहे कि एसआयपी च्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक केल्यास पुढील काही वर्षात एक मोठी रक्कम छोट्या छोट्या हप्त्यामधून तयार करू शकता जी तुम्हाला भविष्यात तुम्हाला अतिशय चांगला परतावा सुद्धा मिळवून देते.

पण अनेकदा अनेक वेगवेगळ्या कारणांनी एसआयपी चा हप्ता भरायचा राहून जातो. तो हप्ता का भरायचा राहून जातो ते आता आपण बघूया.

एसआयपी चा हप्ता का चुकू शकतो?

हे खरतर हप्ता भरण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं.

मगाशी आपण बघितलं कि एसआयपी चा हप्ता भरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. दर महिन्याला, दर तीन महिन्यांनी, दर सहा महिन्यांनी करु शकता किंवा वर्षातून एकदा एसआयपी चा हप्ता भरता येऊ शकतो. त्याचप्रमाणे हप्ता वेगवेगळ्या माध्यमातूनही भरता येतो. काही गुंतवणूकदार एसआयपी चा हप्ता स्वतः भरतात. काही गुंतवणूकदार एसआयपी चा हप्ता ऑटो डेबिट च्या माध्यमातून भरतात.

ऑटो डेबिट म्हणजे गुंतवणूकदाराच्या बचत खात्यातून दर महिन्याला एसआयपी ची रक्कम आपोआप म्युच्युअल फंडात बँकेच्या माध्यमातून भरली जाते. त्यासाठी गुंतवणूकदाराला बँकेला तशी लेखी सूचना द्यावी लागते.
तसंच अनेकदा काही गुंतवणूकदार पोस्ट डेटेड चेक च्या माध्यमातून सुद्धा एसआयपी चा हप्ता भरतात.

पोस्ट डेटेड चेक म्हणजे असा चेक ज्यावर पुढील दिवसांची तारीख लिहिलेली असते. आणि ज्याला तो पोस्ट डेटेड चेक दिलेला असतो ती व्यक्ती किंवा संस्था संबंधित चेकवर लिहिलेल्या तारखेनंतरच्या दिवशी तो चेक बँकेत भरू शकते. चेक वरील तारखेआधी चेक भरल्यास तो बाउंस होतो म्हणजे त्याचा उपयोग होत नाही.

त्यामुळे जर गुंतवणूकदार स्वतः एसआयपी चा हप्ता भरत असेल तर त्याला तो एसआयपी चा हप्ता दरवेळी आठवणीने भरावा लागतो आणि काही कारणांनी एसआयपी चा हप्ता भरायचा विसरला तर हप्ता चुकू शकतो. हे एक कारण झालं.

दुसरं कारण म्हणजे जर गुंतवणूकदाराने ऑटो डेबिटद्वारे पैसे भरण्याचा पर्याय निवडला असेल तर गुंतवणूदाराला एसआयपी चा हप्ता कापला जाण्याच्या आधीच एक दिवस म्हणजे त्या तारखेच्या आधी एक दिवस संबंधित बँकेच्या बचत खात्यात ज्यातून एसआयपी चा हप्ता कापला जाणार असेल त्या खात्यात एसआयपी च्या हप्त्या साठी आवश्यक तेवढी रक्कम शिल्लक ठेवावी लागते कारण ऑटो डेबिट द्वारे एसआयपीचा हप्ता संबंधित तारखेला कधीही कापला जाऊ शकतो. त्यामुळे काही कारणांनी एसआयपी साठी आवश्यक रक्कम बचत खात्यात ठेवायला गुंतवणूकदार विसरला किंवा असमर्थ ठरला तर एसआयपीचा हप्ता चुकू शकतो.

तिसरं कारण आहे जर गुंतवणूकदाराने पोस्ट डेटेड चेक द्वारे पैसे भरण्याचा पर्याय निवडला असेल तरीसुद्धा गुंतवणूदाराला एसआयपी चा हप्ता कापला जाण्याच्या आधी एक दिवस संबंधित बँकेच्या बचत खात्यात ज्यातून एसआयपी चा हप्ता कापला जाणार असेल तिथे एसआयपीचा हप्त्या भरण्यासाठी आवश्यक तेवढी रक्कम शिल्लक ठेवावी लागते. कारण चेक बँकेमध्ये हप्ता कापला जाण्याच्या दिवशी कधीही सादर केला जाऊ शकतो. आणि काही कारणांनी एसआयपी साठी आवश्यक रक्कम बचत खात्यात ठेवायला गुंतवणूकदार विसरला किंवा असमर्थ ठरला तर एसआयपीचा हप्ता चुकू शकतो.

तर ही होती एसआयपी चा हप्ता का चुकू शकतो याची काही संभाव्य कारणं.

एसआयपी चा हप्ता चुकला तर म्युच्युअल फंड कंपन्या काय करतात?

याबाबतीत वेगवेगळी उत्तरं आहेत. म्हणजे किती हप्ते चुकले तर त्यावर काय होईल हे अवलंबून असतं.

जर तुमचा एक किंवा दोन हप्ते चुकले तर म्युच्युअल फंड कंपनी कुठलाही दंड आकारत नाही. किंबहुना म्युच्युअल फंड कंपन्या तुम्हाला एसआयपीचा हप्ता चुकवल्याबद्दल दंडच आकारत नाहीत. म्हणूनच एसआयपी ला सगळ्यात फ्लेक्सिबल किंवा गुंतवणूकदारांसाठी सोयीचा असा गुंतवणुकीचा पर्याय म्हटलं जातं.

मात्र जर तुमचे सलग तीन हप्ते भरायचे राहिले. उदा. मार्च, एप्रिल आणि मे अशा सलग तीन महिन्यांचे हप्ते भरायचे राहिले तर तुमची एसआयपी संबंधित म्युच्युअल फंड कंपनी कडून बंद करण्यात येते. इथं म्युच्युअल फंड कंपनी कडून एसआयपी बंद करण्यात येते म्हणजे तुम्ही दर महिन्याला किंवा दर तिमाहीला थोडक्यात ज्या प्रकारे तुम्ही एसआयपीचा हप्ता भरता तो हप्ता भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात येते. त्याचा तुमच्या एसआयपी च्या माध्यमातून केलेली आधीच्या गुंतवणुकीवर काहीही परिणाम होत नाही. त्या पैशाची गुंतवणूक म्युच्युअल फंड कंपनी करत राहते आणि तुमचा फायदा सुद्धा ठराविक गतीने वाढत राहतो.

एसआयपी चा हप्ता चुकला तर बँका काही दंड आकारतात का?

आपण एसआयपी चा हप्ता का चुकू शकतो? या मुद्द्यात बघितल्या प्रमाणे एसआयपीचा हप्ता किमान तीन प्रकारे भरता येतो.

जर तुम्ही स्वतः एसआयपीचा हप्ता भरत असाल आणि काही कारणांनी तुमच्याकडून एसआयपीचा हप्ता भरायचा राहून गेला तर त्याबाबतीत बँक दंड आकारत नाही कारण या बाबतीत बँकेचा काही संबंधच येत नाही. गुंतवणूकदार थेट एसआयपीचा हप्ता म्युच्युअल फंडात भरत असतो.

मात्र तुम्ही ऑटो डेबिट द्वारे एसआयपीचा हप्ता भरत असाल तर मात्र बँक तुम्हाला दंड आकारते. ऑटो डेबिट पर्यायात हप्ता चुकण्याचं कारण म्हणजे ज्या दिवशी एसआयपी चा हप्ता जाणार असेल त्या तारखेला तुमच्या बँक खात्यात अपुरा निधी असेल.
बँक ऑटो डेबिट पेमेंट चुकणे या प्रकाराला चेक बाउंस होणे म्हणजे चेक परत जाणे असं मानते आणि त्यासाठी शुल्क किंवा दंड आकारते. हे शुल्क १५० ते ७०० रुपयांपर्यंत असू शकते.

तुम्ही तिसऱ्या पर्यायानी म्हणजे पोस्ट डेटेड ने एआयपीचे पैसे भरत असाल आणि चेक बाउंस झाला म्हणजे चेक परत गेला तरीसुद्धा बँक दंड आकारते. या बाबतीत सुद्धा बहुतेक वेळा तुमच्या बँकेच्या बचत खात्यात ज्यातून एसआयपीचे पैसे भरले जातात त्या खात्यात अपुरा निधी असतो. अशावेळी सुद्धा बँक १५० ते ७०० रुपयांपर्यंत दंड आकारू शकते.

एसआयपी चे एक किंवा दोन हप्ते चुकले तर तुम्हाला ते भरता येतील का?

या बाबतीत आपल्याला आपण याआधी बघितलेल्या एसआयपीमध्ये पैसे भरण्याच्या तीन पर्यायांचा विचार करावा लागेल.

जर तुम्ही स्वतः एसआयपी चे पैसे भरत असाल आणि तुमचे एक किंवा दोन हप्ते भरायचे राहिले तर त्या बाबतीत तुम्ही नियमित हप्त्या बरोबरच चुकलेल्या एक किंवा दोन एसआयपीच्या हप्त्यांची रक्कम भरू शकता. याबाबतीत तुमचं कुठलाही नुकसान होणार नाही.

जर तुम्ही ऑटो डेबिटच्या माध्यमातून एसआयपी चा हप्ता भरत असाल आणि तुमचे एक किंवा दोन हप्ते भरायचे राहिले तर ऑटो डेबिट द्वारे फक्त तुमच्या नियमित हप्त्याची रक्कमच भरली जाईल. कारण तुम्ही बँकेला फक्त नियमित हप्ते भरण्याचीच परवानगी दिलेली असते. चुकलेल्या एक किंवा दोन हप्त्यांची रक्कम मात्र तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने स्वतःच भरावी लागेल.

तसंच तुम्ही पोस्ट डेटेड चेक द्वारे एसआयपीचा हप्ता भरत असाल तरीसुद्धा म्युच्युअल फंड कंपनीकडून नियमित हप्त्याचे पैसेच घेतले जातील कारण तुम्ही पोस्ट डेटेड चेक सुद्धा ठराविक रकमेचा दिलेला असू शकतो. त्यामुळे या बाबतीत सुद्धा चुकलेल्या एक किंवा दोन हप्त्यांची रक्कम तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने स्वतःच भरावी लागेल.

तुमचं एसआयपी खातं बंद करण्यात आलं तर काय होईल?

जर तुम्ही केलेल्या एसआयपी चे सलग तीन हप्ते चुकले तर म्युच्युअल कंपनीकडून तुमचं एसआयपी असलेलं खातं बंद केलं जातं. पण इथं एक खूप मोठा गैरसमज अनेक गुंतवणूकदारांच्या मनात असतो कि एसआयपी बंद झाली म्हणजे गुंतवणूक खातच बंद झालं.

पण या बाबतीत एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल कि एसआयपी बंद होते म्हणजे तुम्ही दर महिन्याला, दर तीन महिन्याला अशा प्रकारे म्युच्युअल फंडात जे पैसे भरत असता ते हप्ते भरण्याची प्रक्रिया बंद होते. तुमच्या एसआयपी बंद होण्याआधी भरलेल्या रकमेला त्यामुळे काहीही नुकसान होत नाही. ती सर्व रक्कम म्युच्युअल फंड कंपनी द्वारे पुन्हा पुन्हा गुंतवली जाते आणि त्या रकमेत वाढही होत राहते.

तुमचं एसआयपी खातं बंद करण्यात आलं तर शिल्लक रकमेच काय करावं?

तुमच्या कडून काही कारणाने सलग तीन एसआयपी भरायच्या राहून गेल्या तर तुमचं एसआयपी खातं म्युच्युअल फंड कंपनीकडून बंद करण्यात येतं.

त्या परिस्थितीत शिल्लक रकमेच्या बाबतीत तुम्हाला दोन पर्याय आहेत -

त्यामुळे वरील दोन्ही पैकी कुठलाही पर्याय तुम्ही निवडू शकता ज्यामुळे तुमची गरज पूर्ण होईल.

तर मंडळी ही होती एसआयपी चा हप्ता चुकला तर काय होईल? या बाबतीत सामान्यपणे गुंतवणूकदारांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. तुम्हाला या बाबतीत अजून काही प्रश्न असतील तर कृपया कमेंटबॉक्स मध्ये नक्की विचारा. हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींबरोबर नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही या प्रश्नांची उत्तरं मिळतील. धन्यवाद.

FAQ - एसआयपी चा हप्ता चुकला तर?

एसआयपी साठी खात्यात शिल्लक नसल्यास तुमचा एसआयपी चा हप्ता चुकेल ज्यामुळे तुम्हाला बँकेकडून दंड आकारण्यात येईल.

एक एसआयपी चुकल्यास तुमच्या गुंतवणुकीवर फारसा फरक पडत नाही. मात्र वारंवार एसआयपी चे हप्ते चुकले तर गुंतवणुकीवर थोडाथोडा परिणाम दिसायला लागतो किंवा सलग तीन हप्ते चुकले तर तुमचं एसआयपी चं खातं बंद होतं.

तुम्ही तुमचा चुकलेला एसआयपी चा हप्ता ऑनलाईन पद्धतीने संबंधित म्युच्युअल फंड कंपनीच्या अँप किंवा वेबसाईट वरून भरू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने म्हणजे संबंधित म्युच्युअल फंड कंपनीच्या शाखेत जाऊन भरू शकता.

जास्तीत जास्त दोन एसआयपी वगळले जाऊ शकतात कारण सलग तिसरा हप्ता चुकल्यास तुमचं एसआयपी खातं बंद करण्यात येतं.  

एसआयपी साप्ताहिक किंवा मासिक दोन्ही चांगल्या आहेत. साप्ताहिक किंवा मासिक या फरकाने फारसा फरक पडत नाही.

एसआयपी साठी सामान्यपणे १ ते १० ही तारीख बहुतेक गुंतवणूकदार निवडतात कारण या काळात त्यांचा पगार होतो आणि इतर देणी सुद्धा द्यायची असतात. त्यामुळे १० तारखेनंतर पैसे संपून जाण्याची शक्यता असते. मात्र, तुमचा असा प्रश्न येत नसेल तर एसआयपी साठी महिन्यातील कुठलीही तारीख तुम्ही निवडू शकता. त्याचा तुमच्या परताव्यावर काहीही परिणाम होत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top