पोस्ट ऑफिस बचत योजना । Post Office Saving Schemes

पोस्ट ऑफिस बचत योजना

मंडळी, आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिसतर्फे चालविल्या जाणाऱ्या बचत योजनांची माहिती ज्याला आपण पोस्ट ऑफिस बचत योजना म्हणूनही ओळखतो. या योजनांमध्ये अगदी १०० रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात करता येते तसंच चांगले व्याजदर आणि भारत सरकारची हमी या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना मिळते.

पोस्ट ऑफिस बचत योजना एकूण १० प्रकारच्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येक वयोगटासाठी कुठली ना कुठली योजना उपलब्ध आहे. अगदी लहान मुलींपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी पोस्ट ऑफिस द्वारे योजना चालवल्या जातात.

पोस्ट ऑफिस बचत खाते

पोस्ट ऑफिसचं बचत खातं हे इतर सामान्य बचत खात्यांसारखं असतं. त्यावर मिळणारा सध्याचा व्याजदर ४% आहे. पोस्ट ऑफिस बचत खात्यावर किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स ५०० रूपये आपल्याला ठेवावा लागतो.

हे खातं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे वापरता येतं. मात्र हे खातं चालू करताना ऑनलाईन चालू करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन फॉर्म भरून त्याबरोबर कागदपत्र जमा करून खातं चालू करावं लागतं.

पोस्ट ऑफिस मुदत ठेव

Post Office Time Deposit

पोस्ट ऑफिस मुदत ठेव हि योजना पोस्ट ऑफिसची एफडी म्हणूनही ओळखली जाते. हि योजना एकूण चार वेगवेगळ्या कालावधींसाठी उपलब्ध आहे. एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षांसाठी. याचे व्याजदरही वेगवेगळ्या कालावधी प्रमाणे वेगवेगळे असतात. एक वर्षासाठी सध्याचा व्याजदर ६.९% आहे, दोन वर्षांसाठी ७.०% व्याजदर आहे, तीन वर्षांसाठी सुद्धा ७.०% व्याजदर आहे आणि पाच वर्षांसाठी ७.५% आहे.

मुदत 

व्याजदर 

१ वर्ष 

६.९%

२ वर्षे 

७.०%

३ वर्षे 

७.०%

५ वर्षे 

७.५%

या योजनेत किमान १००० रूपये भरून खातं चालू करता येतं आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम आपण भरू शकतो.

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिट हि ५ वर्षांची अल्पबचत योजना आहे ज्यात आपल्याला दरमहा किमान १०० रुपये भरावे लागतात. या योजनेचा सध्याचा व्याजदर ६.७% आहे आणि व्याजाचा प्रकार तिमाही चक्रवाढ आहे.

जेष्ठ नागरिक बचत योजना

SBI Senior Citizen Saving Scheme

जेष्ठ नागरिक बचत योजना ही योजना खास जेष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली असून या योजनेची मुदत ५ वर्षे आहे. या योजनेत खातेदाराला दर तीन महिन्यांनी व्याज मिळतं म्हणजे दर तीन महिन्यांनी बचत खात्यावर व्याज जमा होते. या योजनेचा सध्याचा व्याजदर ८.२% आहे.

या योजनेत खातं चालू करायला खातेदाराचे वय किमान ६० वर्षे पूर्ण असावं लागतं. पण सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व्यक्तींसाठी ६० वर्षे पूर्ण होण्याआधी सुद्धा या योजनेत खातं उघडता येतं.

या योजनेत किमान १००० रूपये आणि जास्तीत जास्त ३० लाख रूपये पर्यंत एका व्यक्तीला गुंतवणूक करता येते.

मासिक उत्पन्न योजना

मासिक उत्पन्न योजना हि पोस्ट ऑफिसची अतिशय प्रचलित योजना खातेधारकाला दरमहा व्याज मिळवून देते म्हणजे दरमहा बचत खात्यावर व्याज जमा होते. या योजनेचा सध्याचा व्याजदर ७.४% आहे आहे.

या योजनेत किमान गुंतवणूक १००० रूपये करावी लागते आणि एका व्यक्तीचं खातं असेल जास्तीत जास्त गुंतवणूक ९ लाख रूपये आणि संयुक्त खातं असेल जास्तीत जास्त १५ लाख रूपयेपर्यंत गुंतवणूक करता येते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

National Saving Certificate

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना पाच वर्षांची असून आयकरातून सूट मिळवून देणाऱ्या योजनांपैकी एक आहे. याचा सध्याचा व्याजदर ७.७% आहे.
या योजनेत किमान १००० रूपये आणि जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक करता येते.

पब्लिक प्रॉव्हिडण्ट फंड

अतिशय प्रचलित अशा या योजनेचा कालावधी १५ वर्षांचा आहे. यात आपण किमान वार्षिक ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरू शकतो. या योजनेचा सध्याचा व्याजदर ७.१% आहे.
या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यावर मिळणारा परतावा दोन्ही करमुक्त आहेत.

किसान विकास पत्र

ही सुद्धा एक चांगली बचत योजना असून पैसे दुप्पट करणारी योजना म्हणून प्रचलित आहे. याचा सध्याचा व्याजदर ७.५% आहे या योजनेत गुंतवलेले पैसे आता ११५ महिन्यात म्हणजे ९ वर्षे ७ महिन्यात दुप्पट होतात. या योजनेत किमान १००० रूपये आणि जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक करता येते.

सुकन्या समृद्धी योजना

Sukanya Samriddhi Yojana 2023

भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियाना अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना हि योजना खास मुलींच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या खरचाची तरतूद करण्यासाठी सादर केली होती. या योजनेचा कालावधी २१ वर्षाचा आहे आणि याचा सध्याचा व्याजदर ८.०% आहे.

या योजनेत किमान वार्षिक गुंतवणूक २५० रूपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यावर मिळणारा परतावा दोन्ही करमुक्त आहेत.

महिला सम्मान बचत प्रमाणपत्र

भारत सरकारने खास महिलांसाठी ही योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरू केलेली आहे. या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे आणि याचा सध्याचा व्याजदर ७.५% आहे.

या योजनेत किमान १००० रूपये आणि जास्तीत जास्त २ लाख रुपये गुंतवणूक करता येते. आपण स्वतः महिला असाल किंवा आपल्या घरात कोणी महिला असतील तर आपण त्यांच्या नावावर या योजनेत गुंतवणूक करू शकता.

तर मंडळी, ही होती पोस्ट ऑफिसच्या दहा बचत योजनांची माहिती. पोस्ट ऑफिस बचत योजना या सुरक्षित गुंतवणूक आणि जास्त परताव्यासाठी ओळखल्या जातात. तसंच पोस्ट ऑफिस गावोगावी असतात त्यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक करणं खेडोपाडी राहणाऱ्या लोकांनासुद्धा अगदी सोपं जातं.
तेव्हा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रमंडळींबरोबरशेअर करा. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top