मंडळी, पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेविषयी (Monthly Income Scheme in Post Office) संपूर्ण माहिती ज्यात आपण बघणार आहोत योजनेची पात्रता, ठेवींचे नियम, व्याजासंबंधी माहिती, आयकरात सूट मिळेल का? अशी अजून काही उपयुक्त माहिती. ही पोस्टाची अतिशय प्रचलित योजना आहे जी ठेवीदाराला दर महिन्याला व्याज मिळवून देते.
Table of Contents
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेसाठी पात्रता - Monthly Income Scheme in Post Office Eligibility
- या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. मात्र, अनिवासी भारतीय गुंतवणूक करू शकत नाही.
- यात वयाची कुठलीही अट नाही.
- फक्त अल्पवयीन व्यक्तीसाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते.
- संयुक्त खात असेल तर ते जास्तीत जास्त तीन व्यक्तींचं असू शकतं.
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेसाठी ठेवींचे नियम - Monthly Income Scheme in Post Office Deposit
- या योजनेत आपण किमान ठेव रु. १००० ठेऊ शकतो आणि १००० च्या पटीत रक्कम वाढवू शकतो. उदा. १०००, २०००, ५००० इत्यादी रक्कम आपण गुंतवू शकतो. मात्र, १२००, १५०० अशी रक्कम आपण गुंतवू शकत नाही.
- या योजनेत एका व्यक्तीच्या खात्यात ठेवीची कमाल मर्यादा ९ लाख रुपये आहे. म्हणजे एक व्यक्ती आपल्या खात्यामध्ये जास्तीत जास्त ९ लाख रु ठेऊ शकते. ही मर्यादा ३१ मार्च २०२३ पर्यंत साडेचार लाख होती. पण १ एप्रिल २०२३ पासून ही मर्यादा ९ लाख करण्यात आली आहे.
- संयुक्त खातं असेल तर आपण जास्तीत जास्त १५ लाख रुपये ठेऊ शकतो. ही मर्यादासुद्धा ३१ मार्च २०२३ पर्यंत ९ लाख होती. पण १ एप्रिल २०२३ पासून ही मर्यादा १५ लाख करण्यात आली आहे.
- संयुक्त खात्यात, सर्व संयुक्त खाते धारकांना गुंतवणुकीत समान वाटा असेल.
- पालक म्हणून अल्पवयीन व्यक्तीसाठी उघडलेल्या खात्याची कमाल गुंतवणुकीची मर्यादा वेगळी असेल. म्हणजे अल्पवयीन व्यक्तीच्या खात्यासाठी ९ लाख आणि पालकांचं स्वतंत्र किंवा संयुक्त खातं असेल तर त्याची वर सांगितलेल्या नियमाप्रमाणे मर्यादा असेल.
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेसाठी व्याजासंबंधी माहिती - Monthly Income Scheme in Post Office Interest Rate
- या योजनेचा चालू व्याजदर ७.४% आहे
- खातं उघडल्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यावर व्याज मिळायला सुरुवात होते आणि ते मुदत संपेपर्यंत मिळत राहतं.
- हे व्याज योग्य वेळी काढून घेण्याची जबाबदारी ठेवीदारांची असते आणि ते योग्यवेळी काढून घेतलं नाही तर अशा व्याजावर अतिरिक्त व्याज मिळणार नाही.
- त्यासाठी पर्याय म्हणून ठेवीदार या योजनेच्या खात्याशी बचत खात जोडू शकतो ज्यामुळं आपोआप व्याजाचे पैसे योग्य वेळी बचत खात्यात जमा होतील.
- या योजेतील खात्यात कोणतीही जास्तीची ठेव ठेवल्यास, ठेवीदाराला जास्तीची रक्कम परत केली जाईल आणि जास्तीची रक्कम परत करेपर्यंत त्या जास्तीच्या रकमेवर बचत खात्याचा व्याजदर मिळेल.
- या योजनेत मिळणारं व्याजसुद्धा करपात्र आहे म्हणजे मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो.
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना खातं मुदतीआधी बंद करणे - Monthly Income Scheme in Post Office Premature Withdrawal
- ठेवीच्या तारखेपासून १ वर्षाची मुदत संपण्यापूर्वी कोणतीही ठेव बंद करता येणार नाही.
- खाते उघडण्याच्या तारखेपासून १ वर्षानंतर आणि ३ वर्षापूर्वी खाते बंद केले असल्यास मूळ रकमेतून २% वजावट केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल. म्हणजे १०००० रु ची ठेव असेल तर २०० रु वजा करून ९८०० रु परत केले जातील.
- खाते उघडण्याच्या ३ वर्षांनंतर आणि ५ वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, मूळ रकमेतून १% वजावट केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल. म्हणजे १०००० रु ची ठेव असेल तर १०० रु वजा करून ९९०० रु परत केले जातील.
- खाते मुदतीपूर्वी बंद करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या शाखेत पासबुकसह अर्ज करून बंद करता येते.
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना मुदतपूर्तीनंतर - Monthly Income Scheme in Post Office After maturity
- खाते उघडण्याच्या तारखेपासून ५ वर्षानंतर संबंधित पोस्ट ऑफिसच्या शाखेत पासबुकासह अर्ज करून खाते बंद केले जाऊ शकते आणि खातेदाराला ठेवींचे पैसे परत मिळतील
- मुदतपूर्ण होण्यापूर्वी खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, खाते बंद केले जाऊ शकते आणि नॉमिनी / कायदेशीर वारसांना रक्कम परत केली जाईल.
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना कागदपत्र - Monthly Income Scheme in Post Office Document
या योजनेत खातं सुरु करण्यासाठी
- खाते चालू करण्याचा अर्ज
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
- ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट)
- पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, वीजबिल, पासपोर्ट)
- अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला.
ही कागदपत्र द्यावी लागतील.
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना व्याजाची आकडेमोड- Monthly Income Scheme in Post Office calculator
मंडळी, १ एप्रिल २०२३ पासून मासिक उत्पन्न योजनेचा व्याजदर ७.४% झाला आहे.
मुद्दल मासिक व्याज १०,००० ६२ ५०,००० ३०८ ५,००,००० ३०८३ ९,००,००० ५५५० १५,००,००० ९२५०
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना फायदे - Monthly Income Scheme in Post Office Benefits
या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे आपल्याला व्याज दरमहा मिळतं. ज्याचा उपयोग आपण एखादा मासिक हप्ता भरण्यासाठी करू शकतो. मग तो गाडीसाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता असेल, आयुर्विम्याचा हप्ता असेल किंवा इतर कुठला हप्ता असेल तर आपण तो भरू शकतो किंवा दरमहा मिळणार व्याज आपण पुन्हा आवर्ती ठेवींमध्येसुद्धा गुंतवू शकता आणि त्यातून अजून कमाई करू शकता.
तर मंडळी, ही होती पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेविषयी (Monthly Income Scheme in Post Office) माहिती. या योजनेत खातं चालू करण्यासाठी आपण पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ शकता. तेव्हा जरूर या योजनेचा लाभ घ्या.