मंडळी, आज आपण बघणार आहोत क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा? (How to increase CIBIL Score?).
कर्ज काढणे हा हल्ली आपल्या आयुष्याचा एक आवश्यक घटक झाला आहे. दुचाकी घ्यायची असेल तर आपण कर्ज घेतो, घर घ्यायचं असेल तर आपण कर्ज घेतो, चारचाकी घेताना सुद्धा आपण कर्ज घेतो कारण हल्ली, कर्ज मिळणं पूर्वीपेक्षा खूप सोपं झालंय.
पूर्वी आपल्याला कर्ज मिळवण्यासाठी बँकांच्या चकरा माराव्या लागत पण आता बॅंकाच कर्ज घ्या म्हणून कंटाळा येईपर्यंत फोन करतात. पण आता असं काय झालंय कि बँका कर्ज द्यायला एवढ्या उतावीळ होतात. याच एक प्रमुख कारण आहे क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर.
पण क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा (How to increase CIBIL Score) हे बघण्याआधी आपण बघूया क्रेडिट स्कोअर म्हणजे काय?
Table of Contents
क्रेडिट स्कोअर म्हणजे काय? । What is CIBIL Score?
आपण जे आर्थिक व्यवहार करतो खासकरून कर्ज घेणे आणि फेडणे हा जो प्रकार आहे त्याच्या सगळ्या व्यवहारांची एक संस्था नोंद ठेवते त्या संस्थेचं नाव आहे सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉरमेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. ही संस्था आपल्या क्रेडिट कार्ड आणि कर्जांसह कंपन्यांच्या तसेच व्यक्तींच्या सर्व क्रेडिट-संबंधित व्यवहारांच्या नोंदी ठेवते. खरंतर ही माहिती या संस्थेला बँकाच देत असतात आणि त्याच माहिती आणि नोंदींच्या आधारे, CIBIL ही संस्था, अर्जदार आणि बँका किंवा इतर वित्तीय संस्थांना हा क्रेडिट स्कोअर देते. या क्रेडिट स्कोअरमुळे बँका आणि इतर वित्तीय संस्थांना हे कळतं कि ठराविक व्यक्ती किंवा कंपनी कर्ज मिळण्यास पात्र आहेत कि नाही.
हा क्रेडिट स्कोअर ३०० ते ९०० अंकांदरम्यान मोजला जातो म्हणजे किमान ३०० आणि जास्तीत जास्त ९०० असू शकते. क्रेडिट स्कोअर जेवढा जास्त, तेवढं कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता जास्त असते.
पण मंडळी, हा स्कोअर वाढतो कसा (How to increase CIBIL Score) किंवा कमी कसा होतो याची काही कारणं आहेत. ही कारण आपण नीट समजून घेतली तर आपण हा स्कोअर वाढवू शकतो आणि आपल्याला भविष्यात कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळणं सोपं जाउ शकतं.
आता आपण बघूया हा क्रेडिट स्कोअर वाढवायचा कसा (How to increase CIBIL Score) आणि कमी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा? । How to increase CIBIL Score
-
वेळच्यावेळी हप्ते भरणे -
मंडळी तुम्ही जर कुठलं कर्ज घेतलं असेल किंवा एखादं क्रेडिट कार्ड घेतलं असेल आणि त्यावर काही खरेदी केली असेल तर त्या कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डाचं बील वेळेत भरून टाका. यामुळे काय होईल कि तुमची बँक तुमचा रिपोर्ट सिबिल कडे देईल जो चांगला असेल आणि तुम्हाला त्याचे काही गुण मिळतील जे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवायला उपयोगी ठरतील. मात्र, तुम्ही कर्जाचे हप्ते किंवा क्रेडिट कार्डाच्या बिलाचे पैसे वेळेत भरले नाहीत तर तुमची बँक तुमचा रिपोर्ट सिबिलकडे देताना खराब देईल जो तुमचा क्रेडिट स्कोअर कमी करेल. म्हणून कुठल्याही कर्जाचे हप्ते आणि क्रेडिट कार्डाचं बील वेळेत भरून टाका. -
क्रेडिट कार्डाची मर्यादा जास्तीत जास्त ३० टक्के पर्यंत वापरा -
मंडळी, जर तुमच्याकडे एखादं क्रेडिट कार्ड असेल आणि त्याची मर्यादा २० हजार रुपये असेल तर त्यावर खरेदी करताना ३०% जास्तीत जास्त म्हणजे ६ हजारपर्यंतच खरेदी करा. कारण जर तुम्ही कार्डाच्या जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत म्हणजे ८०% -९०% पर्यंत खरेदी करत असाल तर तुमचा तसा रिपोर्ट सिबिलकडे जाईल आणि त्यानुसार तुमच्या बाबतीत बँकांचं असं मत होईल कि तुम्ही उधारीवर जास्त जगता. कारण दरवेळी तुमचं कार्ड लिमिट ८०-९० % पर्यंत वापरलं जातं. मग याला पर्याय काय?
यावर एक पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या कार्डाच लिमिट म्हणजे मर्यादा वाढवून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही बँकेशी संपर्क करू शकता किंवा एखादी मोठ्या रकमेची खरेदी कार्डद्वारे करा म्हणजे बँक आपोआपच तुमचं कार्डचं लिमिट वाढवेल.
दुसरा पर्याय म्हणजे अजून एखादं कार्ड घ्या. ज्यामुळे तुम्हाला दोन कार्डांवर मिळून जास्त रकमेची खरेदी करता येईल. फक्त कुठलंही कार्ड घेताना त्यावरची प्रोसेसिंग फी किंवा इतर शुल्क कमीत कमी असतील असं बघा. म्हणजे तुम्हाला दोन कार्डाची फी भरण्याचा भुर्दंड पडायला नको. -
एकावेळी अनेक कर्ज किंवा क्रेडिट कार्डांसाठी अर्ज करू नका -
मंडळी, जेव्हा तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड हवं असेल तेव्हा जिथे तुम्हाला खात्रीशीरपणे ते मिळेल अशा ठिकाणीच अर्ज करा. कारण जेव्हा तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्डासाठी अर्ज करता ती संबंधित बँक किंवा संस्था तुमचा क्रेडिट स्कोअर तपासते. आणि तुम्ही जितके जास्त अर्ज केलेले असतील तितकेवेळा बँक तुमचा क्रेडिट स्कोअर तपासेल. आणि जितक्या कमी कालावधीत जितके जास्त वेळा बँक तुमचा क्रेडिट स्कोअर तपासेल तेवढा तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होत जाईल. त्यामुळं कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेताना आधी स्वतःच आपला क्रेडिट स्कोअर तपासा. -
नियमित आपला क्रेडिट स्कोअर तपासा -
मंडळी, जेव्हा तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड हवं असेल तेव्हा तुम्ही स्वतःच तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला पाहिजे म्हणजे तुम्हाला हे माहित होईल कि तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची किती शक्यता आहे. जितका जास्त क्रेडिट स्कोअर तितकी कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता अधिक. जर तुमचा क्रेडिट स्कोअर ८०० पेक्षा जास्त असेल तुम्हाला कर्ज मिळायची शक्यता जास्त असते.
क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी तुम्ही सिबिल च्या वेबसाईटवर जाऊन तो तपासू शकता. किंवा गूगल पे, फोन पे अशा मोबाइल अँप्लिकेशन मधूनसुद्धा तुम्ही क्रेडिट स्कोअर मोफत तपासू शकता.
आणि नियमित म्हणजे रोज नाही तर तुम्हाला आवश्यक वाटेल तेव्हा तपासत जा कारण तुम्ही स्वतः तुमचा क्रेडिट स्कोअर तपासल्याने तो कमी होत नाही. -
कर्ज घेताना तेवढ्याच रकमेचं घ्या जेवढं तुम्हाला फेडता येईल -
मंडळी, ही गोष्ट आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलेलो आहे आणि ती आजही उपयोगी पडते. सामान्यपणे, कर्ज घेण्याचं एक गणित आहे ते म्हणजे कर्जाचा दर महिन्याचा हप्ता तुमच्या महिन्याच्या उत्पन्नाच्या जास्तीत जास्त ३०% किंवा त्यापेक्षा कमी असावा. कारण जर तुम्ही तो हप्ता ३०% पेक्षा जास्त ठेवला तर तुम्हाला पैशांची बचत करणं अवघड होईल. कारण नेहमीचे खर्च तर चालूच राहतात. त्यामुळे परिणाम झाला तर नक्कीच बचतीवर होईल जे तुमच्या भविष्यासाठी घातक असेल. -
क्रेडिट कार्डच बिल पूर्ण आणि वेळेत भरा -
मंडळी, जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहिती असेल कि त्याच बिल भरताना तुम्हाला किमान दोन पर्याय येतात. पहिला, बिलाच्या रकमेतील किमान रक्कम भरा आणि दुसरा, बिलाच्या रकमेतील पूर्ण रक्कम भरा.
मंडळी, क्रेडिट कार्डच बिल भरताना कायम पूर्ण रक्कम भरत जा. याच कारण असं कि जर तुम्ही किमान रकमेचा पर्याय निवडला तर ती रक्कम साधारणपणे एकूण रकमेच्या ५% असते आणि पूर्ण रक्कम भरली नाही तर उरलेल्या बिलाच्या रकमेवर म्हणजे ९५% रकमेवर बँक तुम्हाला व्याज आकारते जे जवळपास ३% महिन्याला म्हणजे वर्षाला ३६% टक्के होतं. त्यावर अजून वेगवेगळी छुपी शुल्क आकारली जातात म्हणजे सर्विस टॅक्स, उशीरा पैसे दिल्याचं शुल्क आणि बरच काही. यावर कडी म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअरसुद्धा यामुळे खराब होतो. त्यामुळे एकत्र खर्च करताना जेवढे भरायला जमतील तेवढेच करा आणि बिलाचा पेमेंट पूर्ण करा किमान रक्कम नको. -
जुनं क्रेडिट कार्ड बंद करू नका -
मंडळी, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. तुमचं क्रेडिट कार्ड जेवढं जुनं असेल तेवढी तुमची क्रेडिट हिस्टरी म्हणजे आर्थिक पत चांगली असते. पण त्यासाठी तुम्ही आता सांगितलेले पहिले सहा मुद्दे नीट पाळले पाहिजेत आणि समजा काही कारणांनी तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करायचं असेल तर आधी एखादं दुसरं क्रेडिट कार्ड घ्या ते किमान ५ वर्षंतरी वापरा आणि मग जुनं कार्ड बंद करा. कारण ५ वर्ष एखादं कार्ड वापरल्यानी तुमची चांगली क्रेडिट हिस्टरी तयार होते. -
क्रेडिट कार्डचा नियमित वापर करा -
मंडळी, जर तुमच्याकडं एखादं क्रेडिट कार्ड असेल तर ते नियमित वापरा. अधूनमधून वापरतो असं करू नका. कारण कार्डाच्या नियमित वापराने बँक तुमच्या व्यवहारांची नोंद नियमितपणे सिबिल कडे पाठवेल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला होईल. -
क्रेडिट हिस्टरी -
मंडळी, आत्तापर्यन्त सांगितलेले मुद्दे तुम्ही नीट पाळलेत तर तुमची एक चांगली क्रेडिट हिस्टरी तयार होईल म्हणजे आर्थिक पत जी तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यास सगळ्यात जास्त कारणीभूत ठरते. तुमच्या व्यवहारांची नोंद जितकी जुनी तेवढी तुमची पत जास्त चांगली. तुम्ही बिलं जेवढी वेळेत आणि पूर्ण भराल तेवढा तुमचा क्रेडिट स्कोअर वाढण्यास जास्त वाव असेल. जसं एखाद्या गावात पिढ्यानपिढ्या एखाद्या कुटुंबाची पत असते किंवा मान असतो तसंच काहीसं याबाबतीतही असतं.
तर मंडळी आज आपण बघितलं क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा (How to increase CIBIL Score) आणि पहिले काही मुद्दे जे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यास किंवा कमी करण्यास कारणीभूत ठरतात. या मुद्यांचं नक्की पालन करा म्हणजे भविष्यात तुम्हाला कर्ज या प्रकारासंबंधी कधीच अडचण येणार नाही. धन्यवाद.