Sukanya Samriddhi Yojana vs SIP मध्ये जास्त चांगला कोण?

sukanya samriddhi yojana vs sip

मंडळी, आज आपण बघणार आहोत एक तुलनात्मक व्हिडिओ ज्यामध्ये आपण एका सरकारी योजनेशी तुलना करणार आहोत एका स्वतंत्र गुंतवणुक योजनेशी. गुंतवणुक योजना म्हणण्यापेक्षा गुंतवणुकीच्या पद्धतीशी ही तुलना आपण करणार आहोत. कारण ही तुलना होणार आहे Sukanya Samriddhi Yojana vs SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. कारण आपल्याला अनेकदा हा प्रश्न पडतो कि एवढे गुंतवणुकीचे पर्याय आहेत पण गुंतवणूक नेमकी करायची कुठे? तर त्यापैकी दोन पर्यायांची तुलना करून आपण हे उत्तर आज शोधणार आहोत.

खरतर SIP ही गुंतवणूक योजना नाहीये तर गुंतवणुकीची पद्धत आहे आणि जर सुकन्या समृद्धी योजनेची आपण नीट माहिती बघितली तर सुकन्या समृद्धी योजनेत सुद्धा आपण SIP सारखी म्हणजे दरमहा गुंतवणूक करू शकतोच. त्यामुळे आज या व्हिडिओ मध्ये एक सरकारी SIP आणि दुसरी प्रायव्हेट SIP अशी ही तुलना होणार आहे.

मंडळी, आज आपण बघणार आहोत
नंबर एक - सुकन्या समृद्धी योजना आणि SIP मधला मूलभूत फरक,
नंबर दोन - कुठे गुंतवणूक केली तर आपल्याला जास्त फायदा होईल

सुकन्या समृद्धी योजना ही फक्त मुलींसाठी आहे ती सुद्धा १० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींसाठी. त्यामुळे इथे फक्त १० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींसाठीच गुंतवणूक करता येते. ही योजना भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत सुरु करण्यात अली होती.
SIP मध्ये मात्र अशी कुठलीही अट नाही यात कुठल्याही वयाची व्यक्ती गुंतवणूक करू शकते.

Sukanya Samriddhi Yojana vs SIP किमान आणि कमाल गुंतवणूकीची मर्यादा

सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान गुंतवणूक २५० रुपये करावी लागते. SIP मध्ये अगदी १०० रुपयांपासून गुंतवणूक करता येते.
सुकन्या समृद्धी योजनेत जास्तीत जास्त वार्षिक गुंतवणूक दीड लाख रुपये करता येते. SIP मध्ये अशी कुठलीही मर्यादा नाही तुम्हाला जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करता येते.

Sukanya Samriddhi Yojana vs SIP लॉक इन पिरियड

सुकन्या समृद्धी योजनेत २१ वर्षांचा लॉक इन पिरियड असतो. म्हणजे २१ वर्षाच्या आत खात बंद करता येत नाही. फक्त काही ठराविक कारण सोडली तर उदा मुलीचं लग्न ठरलं तर आपण त्या लग्नाच्या खर्चासाठी खातं बंद करू शकतो. कारण आपण याच हेतूनी खात चालू केलेलं असतं. आणि तो हेतू जेव्हा सफल होतो तेव्हा खातं चालू ठेवायची गरज उरत नाही. मात्र, त्यासाठी मुलीचं वय किमान १८ वर्ष असावं लागतं.

SIP मध्ये मात्र असा काही लॉक इन पिरियड नसतो. काही SIP मध्ये असतो पण तो आपला टॅक्स वाचवण्यासाठी असतो आणि तो लॉक इन पिरियड किमान ३ वर्षांचा असू शकतो.

Sukanya Samriddhi Yojana vs SIP आंशिक रक्कम काढण्याची सुविधा

सुकन्या समृद्धी योजनेत मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तुम्हाला पैसे काढता येत नाहीत. मुलगी जेव्हा १८ वर्षांची होईल तेव्हा एकूण रकमेच्या जास्तीत जास्त ५०% रक्कम काढता येते.

SIP मध्ये मात्र असं काही नसत. तुम्ही फक्त टॅक्स सेव्हर SIP मध्ये गुंतवणूक केली असेल तर पहिली तीन वर्ष पैसे काढू शकत नाही. त्यानंतर मात्र सगळे पैसे सुद्धा काढू शकता. मात्र टॅक्स सेव्हर SIP नसेल तर कधीही पैसे काढू शकता.

Sukanya Samriddhi Yojana vs SIP व्याजदर

सुकन्या समृद्धी योजनेचा चालू व्याजदर ८% आहे. हा व्याजदर कायम एवढाच राहील याची खात्री नसते. हा व्याजदर प्रत्येक तीन महिन्यांनी बदलू शकतो. पण ही योजना चालू झाल्यापासून या योजनेचा सगळ्यात कमी व्याजदर ७.६% होता. तो सुद्धा कोरोना च्या काळात जेव्हा सगळं जग बंद होत आणि त्याचा प्रभाव पुढे दोन वर्ष तसाच राहिल्यामुळे व्याजदर ७.६% होता. पण तरीसुद्धा हा व्याजदर समान राहात नाही. बदलू शकतो.

SIP ला व्याजदर नसतोच कारण त्यावर व्याजच मिळत नाही तसंच गुंतवणूक जास्त करून शेअर मार्केट मध्ये केली जाते. मात्र SIP चा गेल्या १० वर्षाचा परतावा बघितला तर वार्षिक १२-१५% च्या दरम्यान मिळत आला आहे.

Sukanya Samriddhi Yojana vs SIP आयकरात सूट

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीच्या रकमेवर आयकर कलम ८० सी अंतर्गत दीड लाखापर्यंत सवलत मिळते. SIP मध्ये जर टॅक्स सेव्हर SIP असेल आयकर कलम ८० सी अंतर्गत सवलत मिळते. पण सगळ्या SIP ला ही सवलत नसते.

सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी मिळणाऱ व्याज पूर्णपणे करमुक्त आहे. SIP मध्ये आपण जोपर्यंत विक्री करत नाही तोपर्यंत इन्कम टॅक्स लागू होत नाही. मात्र जेव्हा SIP मध्ये आपण विक्री करतो तेव्हा त्या परिस्थितीनुसार टॅक्स भरावा लागतो.

सुकन्या समृद्धी योजनेत मिळणाऱ्या परताव्यावर म्हणजे मुदत संपल्यावर मिळणाऱ्या रकमेवर सुद्धा कुठलाही टॅक्स लागू होत नाही. SIP मध्ये मात्र जशी विक्री करू त्याप्रमाणे टॅक्स लागू होतो. मात्र त्यालाही काही नियम आहेत. उदा. SIP मध्ये एका आर्थिक वर्षात १ लाखापर्यंत फायदा झाला तर टॅक्स भरावा लागत नाही. मात्र १ लाखापेक्षा जास्त फायदा झाला तर एक लाखापेक्षा जास्त होणाऱ्या रकमेवर टॅक्स भरावा लागतो.


सुकन्या समृद्धी योजना 

SIP 

दरमहा रक्कम 

२,००० रु (वार्षिक २४,००० रु )

२,००० रु (वार्षिक २४,००० रु)

एकूण गुंतवणूक 

३,६०,००० रुपये (१५ वर्ष)

३,६०,००० रुपये (१५ वर्ष)

मुदत 

१५ वर्षे 

१५ वर्षे 

व्याजदर / टक्केवारी 

८%

१२%

परतावा 

७,०३,७८३ रु 

१०,०९,१५२ रु 

Sukanya Samriddhi Yojana vs SIP परतावा

ही तुलना आपण करूया दोन्हीच्या गुंतवणुकीवर, मुदत आणि परताव्याची टक्केवारी या मुद्द्यांवर.

आपण असं समजूया कि आपण दोन्हीकडे म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेत आणि SIP मध्ये दरमहा २००० रु भरले.

सुकन्या समृद्धी योजनेत १५ वर्ष पूर्ण होईपर्यंत पैसे भरावे लागतात. त्यामुळे आपण दोन्ही कडे पैसे १५ वर्ष भरले तर किती रक्कम मिळेल ते बघूया.

तसंच सुकन्या समृद्धी योजनेत व्याजदर ८% आहे तो १५ वर्ष तसाच राहील असं समजूया. SIP मध्ये परताव्याची टक्केवारी साधारणपणे १२-१५% असते. पण आपण किमान टक्केवारी म्हणजे १२% धरूया.

अशाप्रकारे सुकन्या समृद्धी योजनेत आणि SIP मध्ये अशा दोन्हीकडे आपली गुंतवणूक दरमहा २००० रुपये प्रमाणे १५ वर्षांनी ३,६०,००० रु होईल

दर महिन्याला २००० रुपये जमा केल्यावर सुकन्या समृद्धी योजनेत ८% व्याजदराने १५ वर्षांनी मिळणारी रक्कम ७,०३,७८३ रुपये एवढी असेल आणि SIP मध्ये १२% व्याजदराने १५ वर्षांनी जमा होणारी रक्कम १०,०९,१५२ रुपये एवढी असेल.

ही सगळी आकडेमोड तुम्हाला करून बघायची असेल तर तुम्ही गूगल वर जाऊन सुकन्या समृद्धी योजनेसाठी आणि SIP साठी उपलब्ध असलेले ऑनलाईन calculator वापरून ही आकडेमोड करून बघू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेत १५ वर्षांनंतर आपल्याला पैसे भरावे लागत नाहीत तर जमा रकमेवर पुढची ६ वर्ष व्याज मिळत राहतं. हा प्रकार एखाद्या lumpsum म्हणजे एकरकमी गुंतवणुकीसारखा असतो.
त्यामुळे आपण पुढची आकडेमोड आता त्याप्रमाणेच करून बघूया.

तर मगाशी बघितलेल्या हिशोबाप्रमाणे दर महिन्याला २००० रुपये जमा केल्यावर सुकन्या समृद्धी योजनेत ८% व्याजदराने १५ वर्षांनी मिळणारी रक्कम ७,०३,७८३ रुपये एवढी असेल आणि SIP मध्ये १२% व्याजदराने १५ वर्षांनी जमा होणारी रक्कम १०,०९,१५२ रुपये एवढी असेल.


सुकन्या समृद्धी योजना 

एकरकमी गुंतवणूक 

एकूण गुंतवणूक

७,०३,७८३ रु

१०,०९,१५२ रु 

मुदत 

६ वर्षे 

६ वर्षे 

व्याजदर / टक्केवारी 

८%

१२%

परतावा 

११,१६,८१५ रु 

१९,९१,८८७ रु 

त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेत १५ वर्षांनंतर पुढची ६ वर्ष आपल्याला व्याज मिळत राहतं आणि त्यामुळे २१ वर्षांनी आपल्याला ११,१६,८१५ रुपये मिळतील.
अगदी तसच SIP मध्ये आपण १५ वर्षांनी दरमहा पैसे भरणं बंद केलं आणि जमा रक्कम २१ वर्ष पूर्ण होईपर्यंत फंडात तशीच ठेऊन दिली तर आपल्याला त्यावर परतावा मिळत राहतो. त्यामुळे जर १६ ते २१ वर्षांपर्यंत आपल्याला १२% दराने परतावा मिळत राहिला तर २१ वर्षांनी SIP ची रक्कम १९,९१,८८७ रुपये एवढी होईल.

तर मंडळी तुम्ही बघू शकता जर सुकन्या समृद्धी योजनेत आणि SIP मध्ये दरमहा २००० रुपये आपण भरत राहिलो तर किती फायदा मिळू शकतो.

इथं एक महत्वाचा मुद्दा विचारात घ्यावा लागेल तो म्हणजे दोन्ही योजनांची परताव्याची टक्केवारी. सुकन्या समृद्धी योजनेची व्याजाची टक्केवारी आत्ता ८% असली तरी ती दर तीन महिन्यांनी बदलू शकते. मात्र याचा अर्थ असा नाही कि कमीच होईल. वाढू पण शकते कारण सुकन्या समृद्धी योजनेचा आत्तापर्यंतचा सगळ्यात कमी व्याजदर ७.६% होता तोसुद्धा कोरोना च्या काळात झाला होता आणि पुढे वर्ष दीड वर्ष तसाच होता.

SIP च्या बाबतीत सुद्धा मागील १० वर्षांचा परतावा बघितला तर तो किमान १२ टक्के आहे. आणि तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंडाचा रिपोर्ट बघितला तरी १२% पेक्षा जास्तच परतावा त्यांनी दिलेला आहे. मात्र एक गोष्ट SIP च्या बाबतीत लक्षात ठेवावी लागेल कि SIP मध्ये गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी करायची असते तरच त्याचा योग्य फायदा आपण मिळवू शकतो.

निष्कर्ष

तर मंडळी आजच्या या सगळ्या माहितीवरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते कि सुकन्या समृद्धी योजना सुद्धा परतावा खूप चांगला देते. तसंच त्यावर १ रुपया टॅक्स भरावा लागत नाही. म्हणजे भरलेले पैसे आणि व्याज सगळं करमुक्त.
SIP मध्ये टॅक्स भरावा लागतो पण परतावा सुद्धा तसा मिळतो.

त्यामुळे तुम्हाला करमुक्त आणि १००% सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर सुकन्या समृद्धी योजना अतिशय चांगली आहे. ही योजना सरकारी आहे त्यामुळे पैसे बुडण्याची शक्यताच नाही. आणि परतावा इतका मिळेल कि तुम्ही तुमच्या मुलीला सहज चांगलं शिक्षण द्याल आणि त्यासाठी तुम्हाला आयत्या वेळी पैशासाठी धावपळ करावी लागणार नाही. तसंच लग्नाचा खर्च सुद्धा सहज करू शकाल.

मात्र तुम्हाला थोडी रिस्क चालणार असेल तर SIP हा सुद्धा अतिशय चांगला पर्याय आहे. कारण SIP मध्ये तुम्ही जेवढ्या जास्त कालावधीसाठी गुंतवणूक कराल तेवढी मोठी रक्कम तुम्ही उभी करु शकाल.

यात एक तिसरा पर्याय म्हणजे दोन्ही मध्ये थोडी थोडी गुंतवणूक. म्हणजे गुंतवणुकीचा एक भाग तुम्हाला १००% सुरक्षित आणि चांगला परतावा देईल. वर आयकरात बचत मिळवून देईल आणि दुसरा पर्याय थोडा रिस्की असेल पण तुम्हाला कल्पना सुद्धा येणार नाही असा परतावा देऊन जाईल.

तर मंडळी, आज आपण सुकन्या समृद्धी योजना आणि SIP मध्ये जास्त चांगला कोण? ते बघितलं. तुम्हाला हा विडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top