शेअर मार्केटमधील ट्रेडिंगचे प्रकार । 4 Types of Trading in Share Market

Types of Trading in Share Market - आज आपण बघणार आहोत शेअर मार्केटमध्ये आपण जे ट्रेडिंग करतो त्याचे किती आणि कोण कोणते प्रकार आहेत. हे सर्व प्रकार प्रामुख्याने इक्विटी शेअर मार्केट साठी वापरले जातात.

इक्विटी शेअर मार्केट म्हणजे जिथे इक्विटी शेअर्सचे सौदे किंवा व्यवहार केले जातात ते ठिकाण आणि ज्या शेअर्सची खरेदी आणि विक्री आपण शेअर मार्केट मध्ये करतो त्या शेअर्सना इक्विटी शेअर्स असं म्हणतात. तसंच, आपण शेअर मार्केटमध्ये जी शेअर्सची खरेदी आणि विक्री करतो त्याला ट्रेडिंग असं म्हणतात.

शेअर मार्केटमधील ट्रेडिंगचे प्रकार (Types of Trading in share market)

आता आपण ट्रेडिंगचे जे प्रकार (Types of Trading) बघणार आहोत ते त्या त्या ट्रेडिंगच्या कालावधी वरून ठरवले गेले आहेत. इथे कालावधी म्हणजे खरेदी आणि विक्री यांमधील वेळेचे अंतर. आणि हे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

डे ट्रेडिंग किंवा इंट्रा डे ट्रेडिंग (Day or Intra day trading)

या प्रकारात खरेदीदार ज्या दिवशी शेअर खरेदी करतो त्याच दिवशी ते विकतो त्याला डे ट्रेडिंग असं म्हणतात आणि हे व्यवहार शेअर मार्केटच्या वेळात म्हणजे सकाळी सव्वा नऊ ते दुपारी साडेतीन पर्यंत करावे लागतात.

हा प्रकार बाकीच्या सगळ्या प्रकारात अवघड आहे कारण डे ट्रेडिंग करताना मार्केटचे चढ उतार, शेअर्सच्या भावातले चढउतार अशांसारख्या गोष्टींवर सतत लक्ष ठेवावं लागतं. कारण थोडसं जरी दुर्लक्ष झालं तरी आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ज्या लोकांकडे पुरेसा वेळ आहे, तसेच ज्या लोकांना शेअर मार्केटचा चांगला अनुभव आहे. त्याच लोकांनी शक्यतो या प्रकाराचा उपयोग करणं योग्य ठरतं. जे लोक शेअर मार्केट मध्ये नवीन आहेत त्या लोकांनी शक्यतो डे ट्रेडिंग करणं टाळावं.

या प्रकारात जो काही फायदा किंवा तोटा होतो तो त्याच दिवशी होतो. त्यामुळे प्रत्येक नवीन दिवस हा नवीन व्यवहारांनी सुरू होतो.

डे ट्रेडिंग साठी ब्रोकर्स आपल्याला जवळपास दहापट जास्तीचं क्रेडिट उपलब्ध करून देतात.
उदाहरणार्थ - आपण पंधरा हजार रुपये ब्रोकरकडे भरले असतील तर त्या बदल्यात ब्रोकर आपल्याला दीड लाखाचं क्रेडिट लिमिट देतात म्हणजे आपण प्रत्येक दिवशी दीड लाखापर्यंत ट्रेडिंग करू शकतो. अर्थात हे क्रेडिट लिमिट प्रत्येक ब्रोकर साठी वेगळं असू शकतं.

जर आपण ब्रोकरकडून हे जास्तीच लिमिट घेऊन ट्रेडिंग करत असाल तर आपल्याला त्या दिवशी घेतलेले शेअर्स, मार्केटची वेळ संपायच्या आत विकावेच लागतात अन्यथा ब्रोकर ते शेअर मार्केटची वेळ संपताना म्हणजे साधारण दुपारी साडेतीन पर्यंत परस्पर विकून टाकतात. कारण ब्रोकरला आपल्या नफा किंवा नुकसानिशी काहीही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त मार्केट बंद होताना त्यांनी दिलेलं मार्जिन परत हवं असतं.

आपल्याला ट्रेडिंगमध्ये फायदा झाला तर काही फरक पडत नाही मात्र जर आपल्याला नुकसान झालं तर आपल्याला जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढे पैसे ब्रोकरकडे भरावेच लागतात तरच आपल्याला ब्रोकरनी दिलेले क्रेडिट लिमिट शाबूत राहतं. त्यामुळे शक्यतो जेव्हा आपल्याला शेअर मार्केटचे चांगल्यापैकी ज्ञान होईल तेव्हाच आपण डे ट्रेडिंग करायला सुरुवात करावी.

Types of Trading

स्विंग ट्रेडिंग (Swing Trading)

हा प्रकार थोडाफार डे ट्रेडिंग सारखाच असतो. फक्त ह्यात महत्त्वाचा फरक हा आहे की डे ट्रेडिंग मध्ये आपण ज्या दिवशी शेअर्स घेतो त्याच दिवशी ते विकावे लागतात आणि स्विंग ट्रेडिंग मध्ये आपल्याला शेअर्स विकण्यासाठी काही दिवसांचा किंवा आठवड्यांचा अवधी मिळतो.
उदाहरणार्थ, आपण आज घेतलेले शेअर्स एक आठवड्याने किंवा दोन आठवड्यांनी असे विकू शकतो.

स्विंग ट्रेडिंग हा ट्रेडिंग मधला सगळ्यात जास्त चालणारा प्रकार आहे कारण या प्रकारात आपल्याला रिस्क अगदी थोडीशी असते आणि फायदा होण्याचा प्रमाण हे जास्ती असतं आणि आपले पैसे सुद्धा फार काळ गुंतवून ठेवायची आवश्यकता नसते. जेव्हा आपल्याला वाटेल की आपलं प्रॉफिट आपल्याला मिळालं आहे त्यावेळी आपण शेअर्स विकून बाहेर पडू शकतो. त्यामुळे स्विंग ट्रेडिंग मध्ये आपल्याला पूर्ण वेळ ट्रेडिंगसाठी द्यावा लागत नाही.

शॉर्ट टर्म ट्रेडिंग (Short Term Trading)

शेअर्स खरेदी केल्यानंतर सामान्यपणे एक महिन्यानंतर ते एक वर्षाच्या आधी विकणे याला शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणतात. या प्रकारात रिस्क अतिशय कमी असते कारण आपण आपल्याला हवा तो शेअरचा भाव मिळेपर्यंत वाट बघू शकतो आणि जेव्हा आपल्याला हवा तो भाव मिळेल तेव्हाच आपण तो शेअर विकू शकतो. त्यामुळे नुकसान होण्याचं प्रमाण खूप कमी असतं.

याचा अजून एक फायदा म्हणजे आपण गुंतवलेली रक्कम आपल्याला फार दिवस ठेवावी लागत नाही योग्य वेळी आपण शेअर्स विकून ती काढून घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या शेअर्समध्ये पुन्हा गुंतवणूक करता येते. स्विंग ट्रेडिंग आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंग मध्ये मुख्य फरक हा वेळेच्या मर्यादेचा आहे.

लॉंग टर्म ट्रेडिंग (Long Term Trading)

सामान्यपणे कुठलाही शेअर घेतल्यानंतर एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आपण आपल्याजवळ ठेवल्यास त्याला लॉंग टर्म ट्रेडिंग किंवा इन्वेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक असं म्हणतात. या प्रकारामध्ये आपल्याला डिव्हीडंड, स्प्लिट, बोनस किंवा शेअर्स पासून मिळणारे इतर फायदे मिळू शकतात कारण आपण विकत घेतलेले शेअर्स हवे तेवढे दिवस आपल्याजवळ ठेवू शकतो. किंबहुना याच सर्व प्रकारच्या फायद्यांमुळे आपल्याला लॉंग टर्म ट्रेडिंग मध्ये परतावा जास्त चांगला मिळण्याचे प्रमाण जास्त असतं. मात्र लॉन्ग टर्म साठी शेअर्स निवडताना त्या शेअर्सचा योग्य प्रकारे अभ्यास करणं अतिशय आवश्यक असतं अन्यथा आपली सगळी गुंतवणूक वाया जाऊ शकते.

तर मंडळी हे होते ट्रेडिंगचे चार प्रकार (4 Types of Trading in share market) जे सामान्यपणे शेअर्स मधील व्यवहार करण्यासाठी वापरले जातात.

ट्रेडिंगचे हे चार प्रकार (4 Types of Trading in share market) सामान्यपणे शेअर मार्केट मधले व्यवहार करण्यासाठी वापरले जातात. यातला पहिला प्रकार म्हणजे डे ट्रेडिंग सोडून बाकीचे तीन प्रकार आहेत त्यांना डिलिव्हरी बेस्ड व्यवहार असेही म्हणतात. कारण या प्रकारात आपण शेअर्स विकत घेतल्यानंतर काही दिवस, महिने किंवा वर्ष आपल्याजवळ ठेवतो म्हणजे आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये ठेवतो. मात्र डे ट्रेडिंगमध्ये आपले शेअर्स आपण विकत घेतले तरी ते डिमॅट अकाउंट मध्ये जात नाहीत कारण आपण हे शेअर्स जास्तीत जास्त त्या दिवशी शेअर मार्केटची वेळ संपेपर्यंत आपल्याजवळ ठेवू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top