फक्त Dividend मिळवण्यासाठी शेअर्स खरेदी करावेत का?

dividend

Dividend - मंडळी, आज आपण डिव्हिडंड या शेअर मार्केट मधील एका प्रकाराची माहिती घेणार आहोत. आज आपण बघणार आहोत डिव्हिडंड म्हणजे काय, तो कधी मिळतो आणि त्यासाठीची पात्रता काय? आणि याविषयी अजून बरीच माहिती.

डिव्हिडंड म्हणजे मराठीमध्ये लाभांश. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कंपनीला त्यांच्या व्यवसायात जो काही फायदा होतो; त्यातला काही भाग कंपनी त्यांच्या शेअर होल्डर्समध्ये म्हणजे समभागधारकांमध्ये वाटते त्याला डिव्हिडंड (Dividend) म्हणतात.

Dividend कधी मिळतो?

डिव्हिडंड सामान्य पणे दर तीन महिन्यांनी, सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा दिला जातो. कंपनीचा ताळेबंद किंवा जमाखर्च जेव्हा जाहीर होतो आणि त्यानंतर कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा होते. त्यात सामान्यपणे डिव्हिडंड जाहीर केला जातो.

त्याच वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये डिव्हिडंड मिळण्याची तारीख सुद्धा जाहीर केली जाते. त्या तारखेला जाहीर केलेला डिव्हिडंड प्रत्येक शेअर होल्डरला सांगितलेल्या प्रमाणात मिळतो.
उदाहरणार्थ,
एखाद्या कंपनीने प्रती शेअर ३ रूपये डिव्हिडंड जाहीर केला असेल. आणि आपल्याकडे त्या कंपनीचे ५०० शेअर्स असतील तर आपल्याला एकूण डिव्हिडंड रूपये ५०० x ३ = १५०० मिळेल. (म्हणजे ५०० शेअर्स x डिव्हिडंड प्रती शेअर ३ रूपये)

भारतात डिव्हिडंड सामान्यपणे वर्षातून एकदा दिला जातो. त्याला फायनल डिव्हीडंड (Final Dividend) असं म्हणतात. जो आर्थिक वर्षाच्या शेवटी घोषित केला जातो. पण एखादी कंपनी वर्षाच्या मध्येच सुद्धा डिव्हिडंट घोषित करते त्याला इंटेरिम डिव्हिडंड (Interim Dividend) असं म्हणतात.
तसंच एखादी कंपनी स्पेशल डिव्हिडंड (Special Dividend) सुद्धा घोषित करू शकते.

Dividend मिळणार हे कसे कळते?

डिव्हिडंड मिळणार हे शेअर होल्डर ना कळण्याचे दोन सोपे मार्ग आहेत.

Dividend मिळण्यासाठीची पात्रता

डिव्हिडंड मिळण्यासाठीची पात्रता म्हणजे आपल्याकडे त्या कंपनीचा शेअर असला पाहिजे. पण त्याला सुद्धा काही नियम आहेत.

कंपनी जेव्हा डिव्हिडंड जाहीर करते त्या वेळी काही तारखा पण जाहीर करते.

रेकॉर्ड डेट (Dividend Record Date)

डिव्हिडंड देणारी कंपनी या तारखेला म्हणजे रेकॉर्ड डेटला त्यांच्या शेअर होल्डर्स ची यादी तयार करते आणि त्या यादीनुसार ज्यांच्याकडे कंपनीचे शेअर्स असतील त्या सर्व शेअर होल्डर्सना डिव्हिडंड मिळतो.

एक्स डिव्हिडंड डेट (Ex Dividend Date)

ही तारीख रेकॉर्ड डेटच्या एक किंवा दोन दिवस आधीची असते. ज्या शेअर होल्डर्सना डिव्हिडंड मिळावा अशी इच्छा असते त्यांनी एक्स डिव्हिडंड डेटच्या आधी एक दिवसपर्यंत शेअर्स विकत घेणं अपेक्षित असतं. एक्स डिव्हिडंड डेट आणि त्यानंतर शेअर्स विकत घेतल्यास ते शेअर्स त्या वेळच्या डिव्हीडंड साठी पात्र ठरत नाहीत.

उदाहरणार्थ,
इन्फोसिस कंपनीची या वेळची म्हणजे ऑक्टोबर २०२२ मध्ये मिळणार्या डिव्हिडंडची एक्स डिव्हीडंट डेट 27-10-2022 आहे. त्यामुळे ज्यांना डिव्हीडंट मिळावा असं वाटत असेल त्यांनी इन्फोसिसचा शेअर 26-10-2022 ला शेअर बाजार बंद होईपर्यंत खरेदी करणे अपेक्षित आहे. त्यानंतर म्हणजे 27-10-2022 पासून पुढे खरेदी केल्यास ऑक्टोबर महिन्यात मिळणारा डिव्हीडंट त्या शेअर होल्डर्सना मिळणार नाही.

पेमेंट डेट (Dividend Payment Date)

यात एक तारीख अजून असते त्याला पेमेंट डेट असं म्हणतात. जे शेअर होल्डर्स डिव्हिडंड मिळण्यासाठी पात्र ठरतात त्या सर्वांना पेमेंट डेटला डिव्हिडंड मिळतो म्हणजे डिव्हिडंड ची रक्कम त्यांच्या बचत खात्यामध्ये जमा होते जे बचत खातं त्यांच्या डिमॅट खात्याशी जोडलेलं असतं.

फक्त Dividend मिळवण्यासाठी शेअर्स खरेदी करावेत का?

काही लोकांचं एक धोरण असतं की फक्त डिव्हिडंड साठी शेअर्स खरेदी करायचे आणि डिव्हिडंड मिळाला की शेअर्स विकून टाकायचे.

मंडळी हे धोरण कधीकधी चालतं सुद्धा पण अनेकदा काय होतं की डिव्हिडंड मिळणार आहे म्हटल्यावर त्या शेअरचा भाव एकदम वाढायला लागतो कारण डिव्हिडंड मिळणार आहे म्हणल्यावर लोक तो शेअर मिळेल त्या किमतीला खरेदी करतात. पण एक्स डिव्हीडंड डेट नंतर शेअरचा भाव कधी कधी कमी होतो कारण फक्त डिव्हिडंड साठी शेअर विकत घेणारे लोक एक्स डिव्हीडंड डेट नंतर तो शेअर पटकन विकून टाकतात तसंच एक्स डिव्हीडंड डेटला शेअरचा भाव सुद्धा डिव्हिडंडच्या रकमेनुसार ॲडजस्ट होतो.

त्यामुळे फक्त डिव्हिडंड साठी कुठलाही शेअर विकत घेणं हे थोडंसं नुकसानीचं ठरू शकतं. म्हणून शक्यतो फक्त डिव्हिडंडसाठी शेअर्स खरेदी करण्याऐवजी एखादा चांगला शेअर घ्यावा जो आपल्याला डिव्हिडंड बरोबर [शेअरचे इतरही फायदे] देईल.

तर मंडळी आज आपण बघितलं डिव्हिडंड (Dividend) म्हणजे काय, तो कधी मिळतो आणि त्यासाठीची पात्रता काय? आणि फक्त Dividend मिळवण्यासाठी शेअर्स खरेदी करावेत का?
आपल्याला या माहितीतून नक्कीच फायदा झाला असेल आणि फायदा असेल तर हा लेख तुमच्या मित्रमंडळींना नक्की वाचायला द्या म्हणजे त्यांना सुद्धा याची माहिती मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top