शेअर मार्केट म्हणजे काय? | What is share market in marathi

आज आपण बघणार आहोत शेअर मार्केट म्हणजे काय ते सुद्धा मराठीतून (What is share market in marathi). शेअर मार्केट (share market) म्हणजे काय? शेअर्स म्हणजे काय? सेन्सेक्स निफ्टी म्हणजे काय? शेअर मार्केट मधले चढ-उतार कसे होतात? शेअर्सचा भाव कमी जास्त कसा होतो?

त्यानंतर आपल्याला जर शेअर मार्केटमध्ये (share market) गुंतवणूक करायची असेल तर ती कशी करायची अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आजच्या लेखामध्ये.

शेअर मार्केट हे एक असं ठिकाण आहे जिथे खरेदीदार आणि विक्रेते दिवसाच्या विशिष्ट तासांमध्ये सार्वजनिकरित्या लिस्टेड शेअर्सवर व्यवहार करण्यासाठी एकत्र येतात. थोडक्यात, शेअर मार्केट म्हणजे असं ठिकाण जिथे शेअर्सची खरेदी विक्री होते किंवा शेअर्सचे व्यवहार होतात.
पण आपल्याला शेअर मार्केट (share market) समजून घ्यायचं असेल तर शेअर्स म्हणजे काय हे समजलं पाहिजे.

शेअर्स म्हणजे काय? (What are shares?)

शेअर्सला मराठीत समभाग असं म्हणतात. थोडक्यात, हा एक प्रकारचा करार असतो जो आपल्याला त्या कंपनीमध्ये भागीदार करून घेतो ज्याचे शेअर्स आपण खरेदी करतो आणि त्या बदल्यात आपल्याला कंपनीला पैसे द्यावे लागतात. मात्र ही भागीदारी आपल्याला कंपनीचे कुठलेही निर्णय घेण्याचा अधिकार देत नाही तर फक्त कंपनीला जो काही फायदा होईल त्यातला वाटा आपल्याला मिळतो.

आपण हे एका उदाहरणाद्वारे बघूया
असं समजा की एखादी कंपनी आहे जिचं समाजात चांगलं नाव झालेलं आहे. त्यांची उत्पादनं सुद्धा सुप्रसिद्ध झालेली आहेत. थोडक्यात ही कंपनी चांगली नावारूपाला आलेली आहे.

समजा या कंपनीचं उत्पादन वार्षिक २० कोटी पर्यंत आहे. आता, व्यवसाय चांगला होऊ लागल्यामुळे त्यांना हे टार्गेट वाढवायचं आहे. त्यामुळे त्यांनी आता हे टार्गेट १०० कोटींचं ठरवलं आहे म्हणजे त्यांना वर्षाला १०० कोटींचं उत्पादन करायचं आहे. आता शंभर कोटींचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना तेवढं भांडवल लागणार कारण २० कोटी वरून १०० कोटींचं उत्पादन करायचं म्हणजे
त्यांना त्यांच्या कंपनीत कामगार वाढवावे लागतील,
त्यांचा पगार द्यावा लागेल,
जास्तीची जागा लागेल,
मशीनरी आणावी लागेल.

अशा अनेक गोष्टी असतील आणि या सगळ्या खर्चाची व्यवस्था करायची म्हणजे निश्चितच तेवढे भांडवल त्यांना लागणार. आता एवढे पैसे उभे करायचे म्हणजे त्यांच्यासमोर दोन ते तीन पर्याय राहतील.

पहिला म्हणजे बँकेकडे कर्ज मागणे. पण बँकेकडे कर्ज मागायला गेले तर सर्वप्रथम बँक त्यांना काहीतरी तारण ठेवायला सांगेल आणि दुसरं म्हणजे कर्ज दिल्यानंतर पुढील महिन्यापासून कर्जाचा हप्ता सुरू होईल. आता कंपनी या परिस्थितीत पुढच्या महिन्यापासूनच कर्जाचा हप्ता द्यायला लागली तर त्यांच्या हातात काहीच फायदा राहणार नाही. सगळं हप्त्यावारीच निघून जाईल. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेणे हा पर्याय सध्या तरी उपयोगी नाही.

मग दुसरा पर्याय असा की एखादा इन्वेस्टर शोधणे जो या व्यवसायात गुंतवणूक करेल पण अशा प्रकारचा इन्वेस्टर शोधला तरी तो एवढी रक्कम देईल याची खात्री नाही आणि जर दिली तर तो व्यवसायात भागीदारी मागेल आणि जर इन्वेस्टरला भागीदार करून घेतलं तर कंपनीला जो काही नफा होईल त्यातला काही भाग त्याला द्यावा लागेल आणि ही गोष्ट आत्ताच्या परिस्थितीत कंपनीसाठी नुकसानीची ठरू शकते. मग पुढे काय?

अशावेळी एक पर्याय अजून असतो. कंपनीचे शेअर्स विकायला काढण्याचा. त्यासाठी कंपनीला आधी स्वतःचं रूपांतर पब्लिक कंपनी मध्ये करावा लागेल. त्यानंतर स्टॉक एक्सचेंजेस मध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल. उदाहरणार्थ, बीएसई (BSE) किंवा एनएसई (NSE) आणि हे रजिस्ट्रेशन केलं की मग कंपनी शेअर्स विकायला पात्र ठरते.

स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? (What Is Stock Exchange?)

स्टॉक एक्सचेंज म्हणजे असं ठिकाण जे कंपनी आणि शेअर्स खरेदी करणाऱ्यांना एकत्र आणतं. जसं कुठल्याही दुकानात कंपनीच्या वस्तू विकायला ठेवल्या जातात आणि लोक ते विकत घेतात तसं. इथं स्टॉक एक्सचेंजचं काम एखाद्या दुकानासारखंच असतं.

आयपीओ म्हणजे काय? (What is an IPO Share Market?)

चला आता आपण असं समजूया की कंपनीने स्टॉक एक्सचेंजेस मध्ये रजिस्ट्रेशन वगैरे केलं आणि आता ते शेअर्स विकायला तयार आहेत. आता कंपनी काय करेल तर वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आपल्या शेअर्सच्या विक्रीची बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. उदाहरणार्थ, शेअर ब्रोकर्स किंवा न्यूज चॅनेल्स असतात ते या विषयी माहिती देतात किंवा वर्तमान पत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या जाहिराती येऊ शकतात. अशा वेगवेगळ्या माध्यमाद्वारे ही बातमी लोकांपर्यंत पोहोचेल.

आता कंपनी किती शेअर्स विकायचे हे कसं ठरवेल तर समजा कंपनीला १०० कोटींची गरज आहे. त्यामुळे कंपनी काय करेल; १०० रुपयांचा एक शेअर असे एक कोटी शेअर्स विकायला काढेल. या प्रकाराला आयपीओ (IPO) म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं म्हणतात. म्हणजे एखादी कंपनी पहिल्यांदाच शेअर मार्केटमध्ये सहभागी होते आणि आपले शेअर्स विकायला काढते तेव्हा त्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं म्हणतात.

यामध्ये कंपनी खरेदीदारांना प्रति शेअर शंभर रुपयांना या भावाने शेअर्स उपलब्ध करून देते. आता लोकांनी शेअर्स घेतले आणि त्यांना कंपनीत भागीदारी मिळते. पण आता शेअर होल्डर्सना याचा काय फायदा? का कंपनी हे पैसे आपल्याला काही दिवसांनी परत देईल? तर नाही असं काहीही होत नाही. कंपनीने एकदा पैसे घेतले की ते आपल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवून टाकतात. आपल्याला परत वगैरे देत नाहीत. मग यात फायदा काय? आपले पैसे आपल्याला परत कधी मिळणार?

शेअर्समध्ये गुंतवणुकीचे फायदे | Benefits of investing in share market

शेअर्समध्ये (share market) गुंतवलेले पैसे आपल्याला किमान दोन प्रकारे परत मिळू शकतात.

पहिला प्रकार म्हणजे जेव्हा आपण घेतलेल्या शेअरचा भाव वाढेल म्हणजे शंभर रुपयाला शेअर समजा १३० ला जाईल तेव्हा आपण हे शेअर्स विकून आपली मूळ रक्कम १०० रुपये आणि जास्तीचा फायदा म्हणजे ३० रुपये आपल्याला परत मिळतात. म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला ३०% फायदा झाला.

दुसरा प्रकार आहे डिव्हीडंड म्हणजे मराठीत लाभांश. डिव्हिडंड म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण आत्ताच्याच कंपनीचे उदाहरण घेऊ.
समजा या कंपनीने १०० कोटीच्या उत्पादनाचं टार्गेट ठेवलं होतं पण त्यांना ११० कोटीचं उत्पादन करता आलं म्हणजेच ठरवलेल्या टार्गेट पेक्षा दहा कोटीचा जास्त उत्पादन करता आलं. त्यामुळे जास्त विक्री करता येईल. आणि जास्त फायदा होईल.

आता काय होतं की कंपनीचे जे संचालक मंडळ असतं ते ठरवतं की आपल्या कंपनीच्या शेअर्समध्ये ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे त्यांना आपण हा जास्त परतावा काहीतरी मार्गाने परत देऊया आणि त्यांनी ठरवलं पाच कोटी रुपये आपण शेअर होल्डर्स मध्ये वाटायचे. त्यामुळे एक कोटी शेअर्स विकले होते आणि पाच कोटी त्यांनी लाभांश म्हणून वाटायचे ठरवले. त्यामुळे प्रत्येक शेअर मागे पाच रुपये हे लाभांश म्हणजे डिव्हीडंड म्हणून दिले जातील. हाच प्रकार दरवर्षी केला जातो जेव्हा कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाला असं वाटतं की आपल्याला अधिक नफा झालेला आहे तेव्हा डायरेक्टर बोर्ड नफ्यातला काही भाग डिव्हीडंडद्वारे शेर होल्डर्स ना परत देतं. हा दुसरा प्रकार झाला आपल्याला पैसे परत मिळण्याचा. मात्र हे दोन्ही फायदे आपल्याला आपल्याकडे शेअर्स असेपर्यंत होतात. एकदा शेअर्स विकले की करार संपुष्टात येतो.

आता पुढचा प्रश्न असा की हे सगळं ठीक आहे पण याची खात्री कोण देणार की हे सगळे व्यवहार होतात हे कायदेशीर आहेत किंवा आपली फसवणूक कुठे होणार नाही.

सेबी म्हणजे काय? (What is SEBI?)

मंडळी, यासाठी भारत सरकारने सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Security and Exchange Board of India) ची स्थापना केली आहे. ही संस्था शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या प्रत्येक व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवून असते आणि त्यांना कुठे जर काही गडबड आढळली तर त्या कंपनीवर लगेच कारवाई होते. त्यामुळे शेअर होल्डर्स मध्ये सुद्धा विश्वासार्हता निर्माण होते आणि हाच सेबीचा मुख्य उद्देश आहे की गुंतवणूकदारांना शेअर मार्केट विषयी खात्री वाटली पाहिजे की आपण जी गुंतवणूक करू ती आपल्याला काहीतरी परतावा निश्चित देऊन जाईल.

तर मंडळी थोडक्यात शेअर्स म्हणजे काय (What are shares?) तर एक प्रकारचा करार जो शेअर होल्डर्स म्हणजे समभाग धारकांमध्ये आणि कंपनीमध्ये होतो जो
१. समभाग धारकांना त्या कंपनीमध्ये भागीदारी मिळवून देतो आणि
२. कंपनीला हवं ते भांडवल मिळवून देतो म्हणजे दोघांचाही फायदा.

मंडळी, आपण या लेखामध्ये याआधी वाचलं असेल की शेअर्सचे भाव वाढले की आपण जास्त भावाला ते शेअर्स विकून कमाई करू शकतो. पण हे शेअर्सचे भाव वाढतात कसे?

शेअर्सचे भाव कसे वाढतात? (How do share prices increase?)

शेअर मार्केट (share market) पब्लिक सेंटीमेंट वर चालतं म्हणजे हा गुंतवणूकदारांच्या भावनांचा खेळ आहे. जिथं एखादी कंपनी तोट्यात जाते तेव्हा त्या कंपनीचे शेअर्स लोक धडाधड विकायला सुरुवात करतात आणि त्या शेअरची किंमत कोसळते. याउलट जिथं एखादी कंपनी चांगली प्रगती करते. त्या कंपनीचे शेअर्स लोक वाटेल ते किमतीला विकत घेतात आणि शेअरची किंमत वाढत जाते.

हे समजून घेण्यासाठी आपण पुन्हा त्याच कंपनीचे उदाहरण घेऊ जे आपण मगाशी बघितले.

समजा कंपनीने १०० कोटीचं टार्गेट ठेवलं होतं आणि त्यांनी ११० कोटीचा व्यवसाय केला म्हणजे त्यांचा १० कोटींचा जास्त व्यवसाय झाला. आता ही बातमी कुठल्यातरी पेपर मध्ये येते किंवा कुठल्यातरी न्यूज चैनल वरती सांगितली जाते आणि हे सगळीकडे कळतं की अमुक एक कंपनी चांगला व्यवसाय करत आहे. त्यामुळे लोक या कंपनीचा शेअर घेण्यासाठी अक्षरशः हवी ती किंमत देतात आणि कंपनीचा भाव वाढत जातो.

या उलट जर कंपनीने शंभर कोटीच्या ऐवजी ८० कोटीचाच व्यवसाय केला असता तर अशी उलट बातमी आली असती की शंभर कोटीचं टार्गेट असून व्यवसाय ८० कोटीचा झाला. त्यामुळे लोकांमध्ये अशी बातमी पसरेल की कंपनीला २० कोटीचा तोटा झाला आणि त्यामुळे लोक घाबरून कंपनीचे शेअर्स विकून पैसे काढून घ्यायचा प्रयत्न करतील आणि पर्यायाने कंपनीच्या शेअरचा भाव घसरायला लागेल. अशा प्रकारे शेअर मार्केट किंवा शेअर्सचा भाव वाढतो किंवा कमी होतो.

Share Market

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची (How to Invest in Share Market)

आपण मगाशी पाहिलं की कंपनी शेअर्स विकायच्या आधी स्टॉक एक्सचेंज मध्ये रजिस्टर होते. तसंच गुंतवणूकदारांनाही रजिस्ट्रेशनची आवश्यकता असते. सामान्य गुंतवणूकदार हा शेअर मार्केटमध्ये (share market) जे काही व्यवहार आहेत ते थेट स्टॉक एक्सचेंज मध्ये करू शकत नाही. त्याच्यासाठी त्याला एका ब्रोकरची गरज लागते. त्याला स्टॉक ब्रोकर किंवा शेअर ब्रोकर असं म्हणतात.

त्यासाठी सर्वप्रथम शेअर ब्रोकर कडे जाऊन दोन प्रकारची अकाउंट चालू करावे लागतात. एक म्हणजे ट्रेडिंग अकाउंट आणि दुसरा म्हणजे डिमॅट अकाउंट.

ट्रेडिंग अकाउंट म्हणजे आपण शेअर्सची खरेदी विक्री ज्याच्याद्वारे करतो ते अकाऊंट आणि डिमॅट अकाउंट म्हणजे जिथे आपले शेअर्स जतन करून ठेवले जातात किंवा साठवून ठेवले जातात ते अकाऊंट. डिमॅट अकाउंट बचत खात्यासारखं असतं. फक्त बचत खात्यामध्ये आपण पैसे साठवून ठेवतो आणि डिमॅट खात्यामध्ये शेअर्स ठेवले जातात.

पूर्वी शेअर्सची सर्टिफिकेट मिळायची पण कालानुरूप त्यामध्ये सुधारणा झाली आणि आता सगळे व्यवहार ऑनलाइन होत असल्यामुळे शेअर्स सुद्धा ऑनलाइन स्वरूपात साठवून ठेवले जातात आणि ते जिथे साठवून ठेवले जातात त्याला डिमॅट म्हणजे डी मटेरियलाईज्ड अकाउंट असं म्हणतात.

यात तिसरं अकाउंट पण आवश्यक असतं ते म्हणजे सेविंग अकाउंट म्हणजे बचत खातं. आपण जेव्हा शेअर्स खरेदी करतो तेव्हा या खात्यातून पैसे वजा होतात आणि जेव्हा आपण शेअर्स विकतो तेव्हा जी काही किंमत येते ती आपल्या बचत खात्यामध्ये जमा होते.

सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय? (Sensex and Nifty)

भारतात प्रामुख्याने दोन प्रकारची स्टॉक एक्सचेंज आहेत.

एक आहे ते बीएसई (BSE) म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरा आहे ते एनएसई म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE). हे दोन्ही एक्सचेंज जरी वेगळे असले तरी आपण एका एक्सचेंज मधनं शेअर घेऊन दुसऱ्या एक्सचेंजमध्ये ते सहजपणे विकू शकतो आणि किंमतही दोघांमध्ये जवळपास सारखीच असते.

सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजशी संबंधित आहे आणि निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजशी संबंधित आहे. निफ्टी किंवा सेन्सेक्स हे त्या त्या एक्स्चेंज मधल्या कंपन्यांचं एक प्रकारचं मूल्यांकन आहे. यामध्ये दोन्ही एक्सचेंज मधले काही ठराविक आघाडीचे शेअर्स निवडले जातात आणि त्यांच्या कामगिरीवर हे ठरवलं जातं की शेअर मार्केट वर गेलं की खाली आलं. त्याला इंडेक्स असंही म्हणतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top