शेअर्समध्ये गुंतवणुकीचे फायदे | 6 Benefits of investing in shares in marathi

Benefits of investing in shares - आज आपण बघणार आहोत, शेअर्स खरेदी केल्यानंतर त्यापासून आपल्याला किती प्रकारे फायदा मिळू शकतो. असे एकूण सहा प्रकार आहेत जे शेअर होल्डर्सना वेगवेगळ्या प्रकारे लाभ मिळवून देऊ शकतात.

पण त्याआधी आपल्याला शेअर्स म्हणजे काय किंवा शेअर मार्केट म्हणजे काय? ही माहिती घ्यावी लागेल त्यासाठी शेअर मार्केट म्हणजे काय? हा लेख वाचा. म्हणजे तुम्हाला लेखातली माहिती नीट कळेल.
तर आता आपण बघूया शेअर्स खरेदी केल्यानंतर त्यापासून मिळणारे ६ फायदे (6 Benefits of investing in shares)

जेव्हा, तुम्ही कुठल्याही कंपनीचा शेअर खरेदी करता आणि काही दिवस तर तुमच्या जवळ ठेवता म्हणजे डिमॅट अकाउंट मध्ये ठेवता, त्यानंतर जसजशी कंपनीची प्रगती होत जाते, कंपनीचा व्यवसाय वाढत जातो आणि ती बातमी सगळीकडे प्रसिद्ध होते. तेव्हा, त्या शेअरसाठी लोक हवी ती किंमत द्यायला तयार होतात आणि शेअर चा भाव वाढत जातो. त्यानंतर तुम्ही तो शेअर विकून फायदा मिळवू शकता.

उदाहरणार्थ,
शेअरचा खरेदीचा भाव १०० रुपये आहे आणि भाववाढ झाल्यावरती तोच भाव १३० रुपयापर्यंत गेला आहे आणि तुम्ही इथे शेअर विकला तर तुम्हाला मूळ किमतीपेक्षा ३० रुपये जास्त मिळतील म्हणजे ३०% फायदा होईल.

डिव्हिडंड (2nd Benefits of investing in shares)

डिव्हिडंडला (Dividend) मराठीत लाभांश असं म्हणतात. लाभांश म्हणजे आपण ज्या कंपनीचे शेअर्स घेतो त्या कंपनीला त्यांच्या व्यवसायात चांगला फायदा झाला तर त्या कंपनीचं संचालक मंडळ असं ठरवतं की त्या फायद्यातला काही भाग आपण आपल्या कंपनीच्या शेअर होल्डर्समध्ये वाटायचा.

उदाहरणार्थ,
एखाद्या कंपनीच्या वार्षिक व्यवसायाचं उद्दिष्ट १०० कोटी ठरवलं गेलं आहे. पण कंपनीच्या चांगल्या कामामुळे तो व्यवसाय ११० कोटींचा झाला म्हणजेच कंपनीला ठरवलेल्या टार्गेटपेक्षा १० कोटीचा जास्त नफा झाला. त्यामुळे कंपनीचं संचालक मंडळ असं ठरवेल की आपण जास्तीच्या १० कोटी मधले ५ कोटी रुपये हे शेअरहोल्डर्सना म्हणजे समभाग धारकांना द्यायचे.

आता समजा कंपनीचे एक कोटी शेअर्स हे एकूण मिळून समभाग धारकांकडे म्हणजे शेअर होल्डर्सकडे आहेत. तर, ५ कोटी भागिले १ कोटी म्हणजे ५ रुपये. याचाच अर्थ प्रत्येक शेअर मागे ५ रुपये लाभांश किंवा डिव्हिडंड म्हणून शेअरहोल्डर्सना मिळतील.

बायबॅक (3rd Benefits of investing in shares)

कधी कधी काय होतं एखादी कंपनी अतिशय चांगली असते. त्यांचा व्यवसाय चांगला होत असतो. मार्केटमध्ये त्यांचं नावही खूप असतं. पण काही कारणाने त्यांच्या शेअरची किंमत मात्र कमीच राहते. आणि शेअर ची किंमत हा सुद्धा कंपनीच्या प्रतिष्ठेचा एक भाग असतो. अशा वेळी कंपनीचं संचालक मंडळ ठरवतं की आपणच यातले काही शेअर्स जास्त भावाला खरेदी करायचे त्याला बायबॅक ऑफ शेअर्स (Buyback of shares).

उदाहरणार्थ,
एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत ५०० रुपये आहे. पण कंपनीला असं वाटते की हा शेअर ७०० ते ८०० रुपये पर्यंत विकला गेला पाहिजे. त्यामुळे कंपनी शेअरहोल्डर्सना कळवते की आम्ही आपल्या शेअर्स मधले काही शेअर्स प्रती शेअर ८०० रुपयाला विकत घेऊ इच्छितो.

आता यात शेयर होल्डर्सचा काय फायदा तर शेअरचा बाजार भाव तर ५०० रुपये आहे पण कंपनी तो ८०० रुपयात घेते. म्हणजे सरळ सरळ ३०० रुपये जास्त भाव मिळतो आहे. त्यामुळे शेअर होल्डर्स नक्कीच ही ऑफर स्वीकारतील आणि कंपनीला शेअर्स विकतील.

याचा अजून एक फायदा असा की शेअर मार्केट मध्ये याच शेअरचा भाव ५०० रूपयेच असेल किंवा थोडा वाढलेला असेल पण ८०० रूपये नक्की नसेल त्यामुळे आपण कंपनीला जेवढे शेअर्स विकले असतील तेवढेच पुन्हा बाजारभावानेच म्हणजे कमी किंमतीत विकत घेऊ शकतो.

Benefits of investing in shares

राईट्स इशू (4th Benefits of investing in shares)

सर्वप्रथम इथे इशू या शब्दाचा अर्थ देणे असा आहे. प्रॉब्लेम असा नाही. राईट्स इशू म्हणजे काय असतं तर कंपनी शेअर होल्डर्सना अजून काही शेअर्स विकत देते. अर्थात शेअरहोल्डर्सना हवे असतील तर. मात्र या शेअरची किंमत बाजारभावापेक्षा म्हणजे मार्केटप्राइस पेक्षा कमी असते.

उदाहरणार्थ,
एखाद्या कंपनीच्या शेअरचा बाजारभाव म्हणजे मार्केट प्राइस १००० रुपये आहे आणि राइट्स इशूद्वारे कंपनीने शेअर्स शेअरहोल्डर्सना द्यायचे ठरवले तर तो भाव १००० पेक्षा कमी म्हणजे ८०० किंवा ९०० रूपये असू शकतो. त्यामुळे काय होतं तर शेअर होल्डर्सना चालू बाजारभावापेक्षा कमी भावात शेअर्स मिळू शकतात याला म्हणतात राइट्स इशू (Rights Issue).

आता कुठलीही कंपनी असं का करते तर कंपनीला एखाद्या प्रोजेक्टसाठी पुन्हा काही प्रमाणात भांडवलाची गरज असते. त्यामुळे अशा प्रकारे कमी किमतीत शेअर विकून ते आवश्यक ते भांडवल मिळवू शकतात. आणि शेअरहोल्डर्सना सुद्धा कमी किमतीत शेअर्स मिळाल्याने फायदा होतो.

बोनस (5th Benefits of investing in shares)

बोनस (Bonus) म्हणजे कंपनी कधी कधी शेअर होल्डर्सकडे जेवढे शेअर्स असतील त्याच्या काही प्रमाणात जास्तीचे शेअर्स विनामूल्य देते.

उदाहरणार्थ,
आपण जर नोकरदार असाल तर आपल्याला कंपनीकडून कधीकधी बोनस मिळत असेल मग तो दिवाळी बोनस असेल किंवा इतर काही बोनस असेल तर तो आपल्या वार्षिक पगाराच्या काही टक्के असतो. इथेही तसंच होतं. फक्त इथं आपल्याला बोनस म्हणून शेअर्स मिळतात.

आता समजा कंपनीने ठरवलं की आपल्याकडे जर एक शेअर असेल तर त्याच्यावर अजून एक शेअर बोनस म्हणून मिळेल म्हणजे १:१ या प्रमाणात. त्यामुळे काय होईल की आपल्याकडे समजा दहा शेअर्स असतील तर त्याचे २० शेअर्स होतील म्हणजे दुप्पट.

मात्र असं केल्यामुळे शेअरची आधी जी किंमत असते ती बोनस मिळाल्यानंतर त्या प्रमाणात कमी होते म्हणजे एकावर एक शेअर बोनस म्हणून मिळाला आणि शेअरची पूर्वीची किंमत १००० रुपये असेल तर ती ५०० रुपये होईल आणि शेअर्स दहा असतील तर त्याचे वीस होतील म्हणजे आपली गुंतवणुकीची रक्कम तीच राहील आणि आपल्याकडे शेअर्सची संख्या १० ची २० होईल.

आता यात फायदा काय तर सर्वप्रथम आपल्या शेअरची संख्या वाढते आणि दुसरं म्हणजे पूर्वी शेअरची किंमत १००० रुपये होती, ती आता ५०० रुपये झाल्यामुळे भाव गुंतवणूकदारांच्या आवाक्यात येईल आणि गुंतवणूकदार हे शेअर्स जास्त प्रमाणात घ्यायला सुरुवात करतील आणि शेअर ची कमी झालेली किंमत हळूहळू वाढत जाईल.

शेअर स्प्लिट (6th Benefits of investing in shares)

शेअर स्प्लिट (Share Split) म्हणजे शेअरचे तुकडे होतात.

उदाहरणार्थ
, आपल्याकडे एक शेअर आहे आणि कंपनीने स्प्लिट जाहीर केला आणि तो एकास एक या प्रमाणात केला तर आपल्या कडील एका शेअरचे दोन शेअर्स होतील आणि त्या शेअरची किंमत सुद्धा त्या प्रमाणात कमी होईल. म्हणजे आपल्या आत्ताच्या उदाहरणाप्रमाणे समजा १००० रुपये किंमत असेल तर ती ५०० रुपये होईल. हा प्रकार वरवर थोडासा बोनस सारखा वाटतो.

स्प्लिट आणि बोनस दिसायला सारखेच वाटले तरी त्याच्यात एक मूलभूत फरक हा आहे की जेव्हा शेअर्स स्प्लिट होतो म्हणजे त्याचे तुकडे होतात तेव्हा त्याची फेस व्हॅल्यू ही त्या प्रमाणात कमी होते म्हणजे समजा शेअरची फेस व्हॅल्यू दहा रुपये आहे तर स्प्लिट नंतर तीच व्हॅल्यू आत्ताच्या उदाहरणाप्रमाणे पाच रुपये प्रति शेअर होईल. मात्र बोनसच्या बाबतीत असं होत नाही.

बोनसच्या बाबतीत आपल्याला कंपनीने ठरवलेल्या प्रमाणात शेअर्स तर मिळतातच पण त्याची फेस व्हॅल्यू सुद्धा आहे तीच राहते आणि मार्केट प्राइस म्हणजे ज्या किमतीला आपण शेअर विकत घेतो ती त्या प्रमाणात कमी होते म्हणजे आताच्या उदाहरणाप्रमाणे निम्मी होते म्हणजे एक हजार रुपयाची पाचशे रुपये होते.

तर मंडळी हे होते शेअर होल्डरला मिळणारे सहा प्रकारचे फायदे (6 Benefits of investing in shares) जे कुठल्याही शेअर होल्डरला मिळतात. पण आपल्याला ही माहिती कळते कशी की एखाद्या कंपनीने बोनस जाहीर केला आहे किंवा आता सांगितलेल्या पैकी काही जाहीर केलं आहे. तर हे कळण्याचे अनेक मार्ग आहेत. पण दोन अगदी सोपे मार्ग आहेत.

पहिला आहे शेअर बाजाराशी संबंधित न्यज चॅनेल आणि दुसरा म्हणजे ईमेल. जो आपण रजिस्ट्रेशन करताना दिलेला असेल. रजिस्ट्रेशन करताना ईमेल दिलेला नसेल तर तो त्वरित द्या आणि दर दोन तीन दिवसांनी ईमेल बघत जा म्हणजे अशा गोष्टी आपल्याला कळतात.

तर मंडळी, शेअर होल्डरला मिळणारे सहा प्रकारचे फायदे (6 Benefits of investing in shares) आज आपण अगदी थोडक्यात बघितले. यातील प्रत्येक प्रकारावर सांगण्यासारखं बरच काही आहे. त्यामुळे आत्ता सांगितलेल्या प्रत्येक प्रकारावर स्वतंत्र लेख घेऊन आम्ही आपल्यासमोर लवकरात लवकर येऊच. जेणेकरून आपल्याला यातला प्रत्येक प्रकार जास्त चांगला समजेल आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काय काय बघितलं पाहिजे याची सुद्धा चांगली माहिती होईल. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top