Power of Compounding करील तुमच्या संपत्तीमध्ये वाढ

Compounding

मंडळी, आज आपण बघणार आहोत चक्रवाढ (Compounding) म्हणजे काय? याचा आपल्याला बचत किंवा गुंतवणुकीमध्ये कसा उपयोग होतो? चक्रवाढीचा उपयोग करून आपण आपल्या संपत्तीमध्ये कशी वाढ करू शकतो?

व्याजाचे सामान्यपणे दोन प्रकार असतात.
सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज (Compounding).

समजा, तुम्ही बँकेत १०००० रुपयांची मुदत ठेव म्हणजे एफ.डी. एक वर्ष मुदतीसाठी केली आहे. तिचा व्याजदर ६% आहे आणि व्याजाचा प्रकार सरळ व्याज आहे. त्यामुळे त्यावर व्याज मिळताना वार्षिक ६०० रुपये मिळेल.

आता हि मुदत ठेव जरी ५ वर्षांची केली असती तरी त्यावर व्याज वार्षिक ६०० रुपयेच मिळेल म्हणजे ५ वर्षांनी ३००० रुपये. कारण जेव्हा व्याजाचा प्रकार सरळ व्याज असतो तेव्हा मिळणारं व्याज मुदत पूर्ण होईपर्यंत मूळ रकमेवरच मिळतं.
सरळ व्याजाचं उत्तम उदाहरण म्हणजे पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना.

चक्रवाढ व्याज (Compounding) म्हणजे काय?

चक्रवाढ म्हणजे व्याजावर व्याज. चक्रवाढ म्हणजे व्याजदर तोच राहतो आणि ज्या रकमेवर व्याज मिळतं ती रक्कम ठराविक काळाने वाढत जाते. आणि दरवेळी वाढीव रकमेवर ठरलेल्या दराने व्याज मिळते.

आता आपण तेच उदाहरण पुन्हा बघू म्हणजे तुम्ही बँकेत १०००० रुपयांची मुदत ठेव एक वर्ष मुदतीसाठी ठेवली आहे. तिचा व्याजदर ६% आहे. फक्त व्याजाचा प्रकार यावेळी चक्रवाढ आहे.

सामान्यपणे चक्रवाढ व्याज हे दर ३ महिन्यांनी लागू होतं. त्याला तिमाही चक्रवाढ (Compounding) म्हणतात. म्हणजे चक्रवाढ व्याजाची आकडेमोड करताना दर ३ महिन्याचं व्याज मोजतात आणि चौथ्या महिन्यात ते मुद्दलाच्या रकमेत जोडले जाते.

कालावधी 

शिल्लक रक्कम

व्याज 

१-३ महिने 

मुद्दल १०,०००

१५० रु. 

४-६ महिने 

मुद्दल १०,००० रुपये + व्याजाचे १५० रुपये

(१-३ महिन्याचं व्याज)

१५२ रु 

७-९ महिने 

नवीन मुद्दल १०,१५० रुपये + व्याजाचे १५२ रुपये

(४-६ महिन्याचं व्याज)

१५५ रु 

१०-१२ महिने 

नवीन मुद्दल १०,३०२ रुपये + व्याजाचे १५५ रुपये

(७-९ महिन्याचं व्याज)

१५७ रु 


एकूण व्याज

६१४ रु 

पहिल्या ३ महिन्याचं व्याज आत्ताच्या उदाहरणाप्रमाणे १५० रुपये होतं (महिना ५० रुपये या हिशोबाने).

चौथ्या महिन्यात (मुद्दल १०००० रुपये + व्याजाचे १५० रुपये) अशी बेरीज करून नवीन रकमेवर म्हणजे १०१५० रुपयांवर पुढील ३ महिन्यात मिळणारे व्याज मिळेल म्हंजे ४थ्या ते ६व्या महिन्यासाठी. जे अंदाजे १५२ रुपये असेल.

७व्या महिन्यात (नवीन मुद्दल १०१५० रुपये + व्याजाचे १५२ रुपये) अशी बेरीज करून नवीन रकमेवर म्हणजे १०३०२ रुपयांवर पुढील ३ महिन्यात मिळणारे व्याज मिळेल म्हंजे ७थ्या ते ९व्या महिन्यासाठी.

हीच आकडेमोड १०व्या ते १२व्या महिन्यासाठी दरवेळच्या वाढीव रकमेप्रमाणे होईल. त्यामुळे चक्रवाढ पद्धतीने आकडेमोड केल्यास वर्षाच्या शेवटी व्याज, अंदाजे ६१४ रुपये इतके मिळेल. म्हणजे सरळ व्याजापेक्षा १४ रुपये वर्षाला जास्ती.

आता १४ रुपये ही रक्कम छोटी वाटते. पण आपण हेच पैसे दीर्घकाळासाठी गुंतवले तर काय होईल हे बघूया. त्यासाठी आपण हा तक्ता बघू.

यात १०००० रुपये हीच रक्कम ६% व्याजदराने सरळ आणि चक्रवाढ (Compounding) या प्रकारानुसार वेगवेगळ्या मुदतीत कशी वाढेल हे दिल आहे. आणि दोन्ही व्याजाच्या रकमेतला फरक सुद्धा दिला आहे ज्यामुळे आपल्याला चक्रवाढीची म्हणजे Compounding ची ताकद कळेल.

त्यामुळे १०००० रुपये ६% व्याजदराने गुंतवले तर

मुदत (वर्षे)

सरळव्याज

चक्रवाढ व्याज

फरक

३०००

३४६९

४६९

१०

६०००

८१४०

२१४०

१५

९०००

१४४३२

५४३२

२०

१२०००

२२९०७

१०९०७

२५

१५०००

३४३२०

१९३२०

३०

१८०००

४९६९३

३१६९३

तर या तक्त्यामधील माहितीनुसार, सरळ व्याजाने १०००० रुपयांवर ६% व्याजदराने ३० वर्षात १८००० रुपये व्याजापोटी मिळतात म्हणजे मूळ रकमेच्या जवळपास २ पट.
मात्र चक्रवाढ पद्धतीने व्याजापोटी ४९६९३ रुपये मिळतात म्हणजे मूळ रकमेच्या जवळपास ५ पट. थोडक्यात, चक्रवाढीचा फायदा कमी मुदतीत दिसून येत नाही. मात्र जास्त मुदतीसाठी गुंतवणूक केल्यावर त्याचा फायदा स्पष्ट दिसून येतो.

चक्रवाढ व्याजाचं उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रीय बचत योजना, पब्लिक प्रोविडेंट फंड, सुकन्या समृद्धी योजना ज्यात वार्षिक चक्रवाढीनी व्याज मिळतं. तसंच, पब्लिक प्रोविडेंट फंड, सुकन्या समृद्धी योजना दीर्घ मुदतीच्या असल्याने त्यात चक्रवाढीचा (Compounding) चांगला फायदा पण दिसून येतो.

तर मंडळी, आज आपण चक्रवाढ (Compounding) म्हणजे काय? याचा आपल्याला बचत किंवा गुंतवणुकीमध्ये कसा उपयोग होतो? चक्रवाढीचा उपयोग करून आपण आपल्या संपत्तीमध्ये कशी वाढ करू शकतो? इत्यादी माहिती घेतली. आपल्याला ही माहिती उपयोगी वाटली असेल तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा हा लेख वाचायला द्या म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती कळेल. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top